ढवळीत पुरग्रस्तांच्या मदत वाटपाची चौकशी सुरु

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

मिरज तालुक्‍यातील ढवळी येथील पूरग्रस्तांसाठी आलेल्या साहित्यांचे वाटप न करणे आणि पात्र पुरग्रस्तांना मदतीपासून वंचित ठेवल्याच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त खानापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी संदीप पवार यांनी ग्रामपंचायतीचे दप्तर ताब्यात घेतले. ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे सखोल चौकशी करून न्याय देण्याची मागणी केली.

म्हैसाळ : मिरज तालुक्‍यातील ढवळी येथील पूरग्रस्तांसाठी आलेल्या साहित्यांचे वाटप न करणे आणि पात्र पुरग्रस्तांना मदतीपासून वंचित ठेवल्याच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त खानापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी संदीप पवार यांनी ग्रामपंचायतीचे दप्तर ताब्यात घेतले. ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे सखोल चौकशी करून न्याय देण्याची मागणी केली.

महापुराने उद्धस्त ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या कारभाराचा नाहक त्रास सोसावा लागत आहे. दोनशेवर घरांचे नुकसान झाले असताना 52 जणांची यादी पंचायत समितीला पाठवण्यात आल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांना गदारोळ केला. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी ढवळीत भेट दिल्यावर महापुराच्या काळात पुरग्रस्तांसाठी आलेले मदत साहित्याचे वाटप न करताच ग्रामपंचायतीत ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला.

याची चौकशी करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे करण्यात आली होती. श्री. राऊत यांनी श्री. पवार यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. श्री.पवार यांनी ग्रामपंचायतीत माहिती घेतली. चौकशीसाठी दफ्तरही ताब्यात घेतले. दरम्यान ग्रामस्थांनी मागणीचे निवेदनही दिले. 

ग्रामसेविका त्रिशला माणगावकर यांच्या चौकशीची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. पूर ओसरल्यानंतर स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या स्वच्छतेसाठी बिल खर्ची टाकले आहे. स्मशानभूमीचे काम अपूर्ण असताना ठेकेदारास बिल दिले आहे. याची चौकशी करावी, अशी मागणी श्री. पवार यांच्याकडे केली आहे. स्वप्नील बनसोडे, आकाश गौराजे, अक्षय पाटील, चेतन स्वामी, प्रमोद कांबळे, पवन कुगे, नागेश पाटील, रावसाहेब पाटील, सुनिल कांबळे, सचिन चौगुले, श्रीराम चौगुले यांच्या निवेदनावर सह्या आहेत. 

दोषींवर निश्‍चित कारवाई

या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. चौकशीसाठी दप्तर ताब्यात घेतले आहे. दोषींवर निश्‍चित कारवाई होईल.

- संदीप पवार, चौकशी अधिकारी तथा बीडीओ 

ग्रामस्थांचा चौकशी अधिकाऱ्यांसमक्ष निषेध

घरभाड्याच्या मदतीसाठी लाभार्थींनी अर्ज करण्यासाठी ग्रामपंचायतीने दवंडी देऊन, नोटीसीद्‌वारे आवाहन करण्याच्या सूचना 14 नोव्हेंबर 2019 रोजी मिरजेच्या गटविकास अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्याचाही ग्रामस्थांनी चौकशी अधिकाऱ्यांसमक्ष निषेध केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Investigation of the distribution of aid to the flood affected people in Dhavali