esakal | इस्लामपूर नगरपालिका वार्तापत्र : विकास आघाडीतील "बिघाडी' दुरुस्त होईल? 
sakal

बोलून बातमी शोधा

Islampur Municipal Newsletter: Will the "breakdown" in the development front be rectified?

आगामी इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरणातील "राजकीय' बदल जाणवू लागलेत. पालिकेत सध्या "सत्तेत' असलेल्या विकास आघाडीतील बिघाड सर्वश्रुत आहे.

इस्लामपूर नगरपालिका वार्तापत्र : विकास आघाडीतील "बिघाडी' दुरुस्त होईल? 

sakal_logo
By
धर्मवीर पाटील

इस्लामपूर (जि. सांगली): आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरणातील "राजकीय' बदल जाणवू लागलेत. पालिकेत सध्या "सत्तेत' असलेल्या विकास आघाडीतील बिघाड सर्वश्रुत आहे. निवडणूक जवळ जवळ येत असताना आघाडी पुन्हा एकत्र येणार का ? पूर्वीप्रमाणेच एकसंधपणे ती निवडणुकीला सामोरे जाणार का ? हा चर्चेचा विषय झाला आहे. 

राज्याच्या सत्तेतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला मातब्बर विरोधक म्हणून विकास आघाडी हाच पर्याय असेल. मात्र विकास आघाडीचे नेते विरोधकांच्या संभाव्य एकजुटीबद्दल अंतर्मुख होणार का? हा प्रश्न आहे. 
साडेचार वर्षांपूर्वी इस्लामपुरात जयंत पाटील यांच्या सत्तेला शह देण्यासाठी भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाडिक युवाशक्ती, रयत क्रांती, शिवसेना, कॉंग्रेसचे काही पदाधिकारी आणि अन्य छोटे मोठे पक्ष यांनी एकत्र येत विकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार आव्हान उभे केले.

राज्यातील सत्तेत भाजप आणि शिवसेना होती. त्याचाही फायदा घेत आघाडीने शहरात सत्ताबदल घडवून आणला. पण नंतरच्या काळात मात्र चित्र बदलत गेले. माजी खासदार व विकास आघाडीचे नेते राजू शेट्टी, तत्कालीन मंत्री सदाभाऊ खोत, विक्रम पाटील, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, राहुल व सम्राट महाडिक, आनंदराव पवार, वैभव पवार यांच्या भूमिकांत बदल झाला. माजी मंत्री खोत आणि नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचे संबंध ताणले गेले. विक्रम पाटील सत्ताधारी असले तरी नगराध्यक्षांशी जुळवून घेण्यात त्यांना कालावधी गेला. 

आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते एकत्र आले आहेत. दरम्यान, विक्रम पाटील आणि खोत यांच्यात काहीकाळ जवळीक होती. आता तीच जवळीक खोत आणि महाडिक यांच्यात निर्माण झाली आहे. जयंत पाटील विरोध ही महाडिक गटाची भूमिका नेहमीच राहिलीत. वैभव पवार कॉंग्रेसचे असले तरी तेही कट्टर जयंत पाटील विरोधकांच्या भूमिकेत असल्यामुळे नगराध्यक्ष पाटील यांच्यासोबत राहिलेत. 


शिवसेनेच्या भूमिकेबाबत मात्र संदिग्धता आहे. कारण मागील निवडणुकीत जरी शिवसेना महाविकास आघाडीचा महत्त्वाचा भाग असली तरी राज्यातील सत्तेत सध्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस एकत्र असल्याने "वरून काय आदेश येतो' त्यावर शिवसेनेची या निवडणुकीतील भूमिका निश्‍चित होईल. 


येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विक्रम पाटील आणि निशिकांत पाटील यांच्यात "जुळण्या' सुरू झाल्या आहेत. सदाभाऊ खोत यांनी महाडिक गटासोबत युती करून पॅनेल उभे करणार असल्याचे वक्तव्य केले होते. प्रत्यक्षात जयंत पाटील यांना विरोधाचे वातावरण निर्माण करायचे झाल्यास ही सर्वपक्षीय विकास आघाडीच परिणामकारक होईल, असे राजकीय तज्ञांचे आडाखे आहेत. 

राज्यातील सत्ता महत्वाची ठरणार 

महाडिक-खोत यांनी तिसरा पर्याय पुढे आणला तर त्याचा अप्रत्यक्ष फायदा जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीलाच होईल! जयंत पाटील सध्या सत्तेत आहेत. त्या माध्यमातून ते इस्लामपुरात परिवर्तन घडवून आणण्यासाठी काहीही करू शकतात, याची विरोधकांना पुरेपूर जाणीव असावी. ते शक्‍य आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 


संपादन : युवराज यादव 
 

loading image