चौथीही सभा तहकूब! भुयारी गटारीसाठी विरोधकांचा आक्रमक पवित्रा : Islampur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इस्लामपूर : भुयारी गटरच्या विषयावर झालेल्या गदारोळात दोन्ही बाजूच्या नगरसेवकांनी एकमेकांवर चिखलफेक केली.

चौथीही सभा तहकूब! भुयारी गटारीसाठी विरोधकांचा आक्रमक पवित्रा

इस्लामपूर (सांगली) : भुयारी गटार योजनेचे काम आधी मार्गी लावा मगच पुढच्या विषयांवर चर्चा करा, असा आक्रमक पवित्रा नगरसेवकांनी घेतल्याने आजची सभा तहकूब करावी लागली. मागच्या सभेत झालेले ठराव अमलात केव्हा येणार? या प्रश्नावर प्रशासन निरुत्तर झाले. भुयारी गटरच्या कामांसाठी प्रशासनाने २० जानेवारीपर्यंत मुदत मागितली. त्यानंतरच बाकीचे विषय चर्चेला घेण्यात येणार आहेत. दरम्यान भुयारी गटर आणि मागासवर्गीय कल्याण समितीची स्थापना या मुद्द्यावर मोठा गदारोळ झाला.

नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आजची सभा झाली. २२ मार्च २०२१ ला घेण्यात आलेली मात्र अवघ्या चार विषयांवर तहकूब झालेली सभा सुमारे ८ महिन्यांनी आज घेण्यात आली. सभेच्या प्रारंभीच वैभव पवार आणि विक्रम पाटील यांनी यापूर्वीच्या सभेत झालेल्या ठरावांची अंमलबजावणी केव्हा करणार? असा प्रश्न उपस्थित करत मागील विषयांना हात घातला. वैभव पवार यांनी आक्रमकपणे दोन व्यायाम शाळा आणि टॉयलेट ब्लॉकच्या बाबतीत यापूर्वीचे ठराव पालिकेने आधी अमलात आणावेत, अशी आग्रही मागणी केली. यावर दोन्ही बाजूने युक्तिवाद झाले.

लाल चौकातील एका मंजूर रस्त्याच्या उद्घाटनावरून 'बोगस टेंडर' असा नामोल्लेख झाल्यामुळे दोन्ही बाजूने मोठा दंगा झाला. बोगस हा शब्द विक्रम पाटील यांनी मागे घ्यावा अशी सूचना संजय कोरे आणि शहाजी पाटील यांनी केली; मात्र विक्रम पाटील यांनी शेवटपर्यंत ते पाळले नाही. आनंदराव पवार यांनी सुरुवातीपासूनच मागच्या विशेष सभेला राष्ट्रवादीने दांडी मारल्याने शहराचे कसे नुकसान झाले आहे यावर वारंवार मतप्रदर्शन नोंदवले.

भुयारी गटरचे काम राखडल्याच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूनी गदारोळ झाला. आनंदराव पवार, विक्रम पाटील यांनी या कामाला राष्ट्रवादीचा विरोध असल्याची टीका केली. त्यावर निवडणुकीच्या तोंडावर विकास आघाडी भुयारी गटरचे अपयश प्रशासनावर ढकलत असल्याचा आरोप संजय कोरे यांनी केला. त्यांनी याचा निषेध नोंदवला. हा विषय रेटत पवार यांनी गटाराचे काम झाल्याशिवाय बाकीचे विषयच घेऊ नका, असा अट्टाहास धरला. मुख्याधिकारी साबळे यांनी प्रशासकीय पूर्तता करून २० नंतर यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

सुरुवातीच्या चर्चेतच ज्येष्ठ नेते बाबासाहेब सूर्यवंशी यांनी विषय पत्रिकेतील मागासवर्गीय कल्याण समितीचा शेवटचा विषय आधी घेण्याची सूचना केली. नंतरच्या चर्चेत या समितीसाठी विकास आघाडीच्या कोमल बनसोडे आधीपासून आग्रही होत्या. या समितीचे सभापतीपद मिळावे अशी मागणी त्यांनी केली; मात्र राष्ट्रवादीच्या संगीता कांबळे यांची सर्वानुमते सभापतीपदी निवड झाली. शहरातील विकास कामांसाठी भरीव निधीची तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्री एकनाथ शिंदे, खासदार धैर्यशील माने, मंत्री दिवाकर रावते आणि नगरसेवक आनंदराव पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

loading image
go to top