इस्लामपूरला आता डेंगीचाही धोका या साथीचाही धोका; खासगी रुग्णालयांत संख्या वाढती 

धर्मवीर पाटील
Friday, 10 July 2020

इस्लामपूर शहरात डेंगीची साथ पसरत चालली आहे. शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे.

इस्लामपूर (जि . सांगली) : शहरात डेंगीची साथ पसरत चालली आहे. शहरातील बहुतांश खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यामध्ये शहरातील नागरिक आहेतच शिवाय वाळवा तालुक्‍यातील काही गावांतील रुग्णांचा समावेश आहे. खुद्द राष्ट्रवादीचे नगरसेवक, माजी सभापती विश्वनाथ डांगे यांच्या मुलाला डेंगीची लागण झाली असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

गेल्यावर्षी शहरात डेंगीची मोठी साथ होती. त्या पार्श्वभूमीवर यंदा एक महिनाभर आधीच नगरपालिकेने उपाययोजना हाती घेतल्या होत्या; परंतु तरीही शहराच्या काही भागांत डेंगी रोखणे अशक्‍य बनले असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. मागील दोन आठवड्यांपासून शहरातील रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत निघाली आहे, मात्र हे रुग्ण शहराच्या बाहेरील गावातील होते. यामध्ये नेर्ले, कासेगाव, कामेरी तसेच वाळवा येथील रुग्णांचा समावेश होता. गेल्या दोन ते तीन दिवसांत मात्र इस्लामपुरातील काही भागात नागरिकांना डेंगीची लागण झाली आहे. रुग्णांची संख्या वाढतच निघाली असून, ही बाब चिंताजनक बनली आहे. 

या पार्श्‍वभूमीवर वाळवा तालुका आरोग्य विभाग तसेच पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील पाणी साठून राहणाऱ्या ठिकाणांचा शोध सुरू करण्यात आला आहे. तसेच पाण्याचे कंटेनर तपासले जात असल्याचे अधिकारी आर. ए. मुश्रीफ यांनी सांगितले. मागील वर्षीचा अनुभव विचारात घेता डेंगीची साथ आटोक्‍यात आणण्यासाठी प्रशासनाला शर्थीचे प्रयत्न करावे लागतील, अशी स्थिती आहे. 

याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील म्हणाले, ""शहरातील स्वच्छता ठेकेदाराची मुदत गेल्यावर्षी संपली आहे. त्यालाच पुन्हा मुदत वाढवून दिली आहे. या ठेकेदाराची काम करण्याची मानसिकता नाही, त्यामुळे स्वच्छतेकडे त्याचे अजिबात लक्ष नाही. त्यामुळे साथीच्या आजारांचा मोठा धोका आहे. पाऊस सुरू झाल्याने डेंगीच्या उपाययोजना सत्ताधारी आणि प्रशासनाने तातडीने हाती घ्याव्यात.''  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Islampur is now at risk of dengue; The number in private hospitals is increasing