इस्लामपुरात मालमत्ताधारकांना करात 50 ते 55 टक्के सवलत 

धर्मवीर पाटील
Friday, 22 January 2021

वाढीव संकलीत कराच्या मुद्यावर गेले तीन दिवस चाललेल्या सुनावणी प्रक्रियेनंतर शहरातील मालमत्ताधारकांना आज संकलीत करात सवलत जाहीर करण्यात आली. झोन क्रमांक एक व दोनसाठी 55 टक्के तर तीन व चारसाठी 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय दोन विरुद्ध तीन मतांनी झाला.

इस्लामपूर : वाढीव संकलीत कराच्या मुद्यावर गेले तीन दिवस चाललेल्या सुनावणी प्रक्रियेनंतर शहरातील मालमत्ताधारकांना आज संकलीत करात सवलत जाहीर करण्यात आली. झोन क्रमांक एक व दोनसाठी 55 टक्के तर तीन व चारसाठी 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय दोन विरुद्ध तीन मतांनी झाला. 

वाणिज्य घटकासाठी गतवर्षी दिलेल्या सवलतीत पाच टक्के वाढवून देत 50 टक्के सवलत जाहीर करण्यात आली, ही माहिती नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील व राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे यांनी दिली. अपील समितीच्या सदस्य जयश्री माळी उपस्थित होत्या. समितीचे अध्यक्ष नागेश पाटील व उपसंचालक नगररचना विभाग श्री. दिंडे या दोन शासकीय सदस्यांचाही अपील समितीत समावेश होता. 

शहरातील 16 हजारहून अधिक मालमत्ता धारकांनी पालिका प्रशासनाकडे अपील दाखल केले होते. त्यावर गेले तीन दिवस सुनावणी झाली. दोन शासकीय सदस्य वगळता इतर तिघांनी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसू नये याचा विचार करून सवलत दिली जावी, अशी ठाम भूमिका समितीसमोर मांडण्यात आली. त्यानुसार सवलतीचा निर्णय झाला. 

नगराध्यक्ष श्री. पाटील म्हणाले,""इतिहासात प्रथमच इतक्‍या मोठ्या प्रमाणात अपिल दाखल झाली. नागरिकांच्या आर्थिक नुकसानीचा विचार करून व्यापक जनहितार्थ न्याय देण्याचा प्रयत्न केला. पालिकेचेही नुकसान होऊ नये, असाही प्रयत्न आहे. उपयोगकर्ता कर आणि बेकायदेशीर बांधकाम केल्याने लावण्यात आलेली शास्ती यावर उद्याच्या सर्वसाधारण सभेत सकारात्मक चर्चा होईल.'' 
गटनेते श्री. कोरे म्हणाले,""कोरोना संसर्गामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. त्याचा विचार केला आहे. वाणिज्य घटकाला मदतीची मोठी गरज होती. त्यानुसार गतवर्षीच्या तुलनेत पाच टक्के जादा सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.'' 

चार झोननिहाय लाभाधारक 
झोन 1 : 4471 
झोन 2 : 10676 
झोन 3 : 5633 
झोन 4 : 1678 
एकूण मालमत्ताधारक 22 499 

"आमच्यावर जाणीवपूर्वक मालमत्ता कर वाढवल्याचा आरोप काहींनी केला होता. त्यावर आज आम्ही घेतलेला सवलतीचा निर्णय हे चोख उत्तर ठरेल.'' 
- निशिकांत पाटील, नगराध्यक्ष 

पालकमंत्री जयंत पाटील यांनी शहरातील नागरिकांवर कराचा बोजा पडू न देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याचा पाठपुरावा केला आहे.'' 
- संजय कोरे, गटनेते 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Islampur, property owners get 50 to 55 per cent tax relief