esakal | इस्लामपूर १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनच राहणार 

बोलून बातमी शोधा

Islampur will remain locked down until April 14

गेले तीन दिवस इस्लामपूर शहरात पूर्ण लॉकडाऊन पुकारण्यात आला होता, त्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. नगरपालिका, महसूल, पंचायत समिती व पोलीस प्रशासनाने कडक अंमलबजावणी केली.

इस्लामपूर १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनच राहणार 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर (जि. सांगली) : शहरात लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत सुरूच राहील, फक्त अत्यावश्यक सुविधा नागरिकांना पुरविण्याची व्यवस्था केली जाईल, असा निर्णय आज प्रशासन व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. उद्या (ता. १) पुढचे नियोजन अधिकृतरित्या जाहीर केले जाणार आहे. 

प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रविंद्र सबनीस, मुख्याधिकारी प्रज्ञा पवार, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. 

गेले तीन दिवस इस्लामपूर शहरात पूर्ण लॉकडाऊन पुकारण्यात आला होता, त्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. नगरपालिका, महसूल, पंचायत समिती व पोलीस प्रशासनाने कडक अंमलबजावणी केली. शहरात दूध, मेडिकल, किराणा या अत्यावश्यक सुविधा देखील बंद करण्यात आल्या होत्या. 21 मार्चनंतर इस्लामपूर शहरातील वातावरण अत्यंत बदलले होते. आधी 4, नंतर 5 व त्यानंतर एकदम 12 अशी कोरोना रुग्णांची संख्या वाढत जाऊन ती 25 वर स्थिरावली आहे. हा वाढता संसर्ग विचारात घेऊन तीन दिवस पूर्ण लॉकडाऊनचा निर्णय झाला होता. 

हे पण वाचा - Video -व्हिडिओ रेकॉर्डद्वारे पोलिसांकडून गांधीगिरी; प्रतिष्ठित समजणाऱ्यांना चपराक

बैठकीत नागेश पाटील यांनी शहरातील मेडिकल सुरू ठेवावेत, प्रभाग समितीने आपापल्या प्रभागात नागरिकांच्या गरजांचा विचार करून पूर्तता करावी, अशी सूचना केली. प्रत्येक प्रभागात 10 जणांची समिती सक्रिय राहील, ती नागरिकांची व्यवस्था बघेल. उपनगराध्यक्ष दादासो पाटील, नगरसेवक संजय कोरे, आनंदराव पवार, खंडेराव जाधव, विक्रम पाटील, शहाजी पाटील, अमित ओसवाल, विश्वनाथ डांगे, बशीर मुल्ला, अमित ओसवाल, वैभव पवार, शकील सय्यद, प्रमिला माने, श्री. मुश्रीफ उपस्थित होते. 

हे पण वाचा - सावधान : मिरजेत घराबाहेर याल तर गुन्हा दाखल 

आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी सांगितले की, वाळवा तालुक्यात आरोग्य विभागाचे 188 कर्मचारी कार्यरत आहेत. परदेशातून आलेलयांची संख्या 94 आहे. त्यात 14 दिवस पूर्ण केलेले 67 आहेत तर 23 जण अद्याप होम क्वारांटाईन आहेत. त्यात ग्रामीण भागामध्ये 38 आहेत. पैकी 27 जणांचे 14 दिवस पूर्ण झाले आहेत. 11 जणांचे घरी अलगिकरण केले आहे. या सर्वांना होम क्वारांटाईन सक्तीचे केले आहे. जिल्हा परिषदेकडून शिक्के मारले आहेत. पथकामार्फत रोज तीन वेळा भेट देऊन त्यांची माहिती घेतली जात आहे.  कोरोनाबाधितांचा 393 जणांशी संपर्क आला होता. त्या सर्वांवर तसेच इस्लामपुरातील कोरोनाग्रस्त भागात रोज 1287 कुटुंबांना भेटी दिल्या जात आहेत. त्यासाठी 31 पथके कार्यरत आहेत. 

मिरज येथे यंत्रणा उपलब्ध
 सांगली जिल्ह्यात कोरोनाचे २५ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सांगली जिल्हा यंत्रणा सज्ज आहे. कोरोनाचे सॅम्पल तपासण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मिरज येथील कोरोना रुग्णालयात अत्याधुनिक टेस्टींग लॅब उभी केली. या लॅबला पालकमंत्री जयंत पाटील यांनी भेट देऊन आढावा घेतला. उद्यापर्यंत ही टेस्टिंग लॅब सामान्य नागरिकांच्या सेवेत कार्यरत होईल. याआधी परिसरातील सॅम्पल पुण्याला घेऊन जावं लागत असे, मात्र यापुढे इथेच या सॅम्पलची तपासणी होईल. सांगलीसह कोल्हापूर, सोलापूर, कोकण, गोवा, कर्नाटक या भागातील सॅम्पलसुद्धा या लॅबमध्ये तपासले जाणार आहेत.