इतना सन्नाटा क्‍यू हैं भाई?.. 

अमित आवारी
शुक्रवार, 20 मार्च 2020

शासकीय- निमशासकीय व काही खासगी कार्यालये सोडल्यास, सर्व आस्थापना बंद आहेत. भाजीबाजारही ओस पडला होता. शाळा बंद असल्याने काही जागृत नागरिकांनी मुले घराबाहेर खेळणार नाहीत याची दक्षता घेतली

नगर ः "कोरोना'चा प्रसार रोखण्यासाठी आज शहरात विशेष दक्षता घेतल्याचे दिसून आले. अत्यावश्‍यक सेवा वगळून सर्व दुकाने, हॉटेले, खाद्यपदार्थांच्या गाड्या, प्रार्थनास्थळे, सभागृहे बंद ठेवली होती. पोलिस प्रशासनाने शहरात जागोजागी नाकेबंदी केली आहे. दुकाने, हॉटेले व फेरीवाल्यांना "बंद' पाळण्याचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे आज शहरात संचारबंदीसदृश स्थिती होती. 
डाळ मंडईजवळ महात्मा गांधी रस्त्यावर प्रवेश बंद करण्यात आला होता. जागोजागी पोलिस, निमलष्करी दलाचे जवान गस्त घालत होते. काल (गुरुवार) दुपारीच शहरातील मुख्य बाजारपेठ बंद करण्यात आली. शासकीय- निमशासकीय व काही खासगी कार्यालये सोडल्यास, सर्व आस्थापना बंद आहेत. भाजीबाजारही ओस पडला होता. शाळा बंद असल्याने काही जागृत नागरिकांनी मुले घराबाहेर खेळणार नाहीत याची दक्षता घेतली. प्रार्थनास्थळे बंद असल्याने त्या परिसरातील दुकानेही बंद होती. नागरिक तोंडाला मास्क लावून फिरताना दिसले. 

विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई 
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज शहरात फेरफटका मारला. त्या वेळी पारशा खुंट भागात विनाकारण फिरणाऱ्या सहा ते सात जणांना जिल्हाधिकाऱ्यांनी अडविले. त्यांच्यावर कारवाईचा आदेश कोतवाली पोलिसांना दिला. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 

महापालिकेकडूनही सतर्कता 
महापालिकेनेही विशेष सतर्कता घेतली आहे. नागरिकांना महापालिकेत प्रवेश बंद केला आहे. 31 मार्चनंतरच नागरिकांनी महापालिकेत यावे, असे प्रवेशद्वारावरच सांगितले जाते. आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी मोजक्‍याच बैठका घेण्याचा निर्णय घेतला. रिक्षांवरील ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. 

कामगारांकडून मास्कची मागणी 
"कोरोना'पासून बचावासाठी महापालिकेकडून कामगारांना अजूनही आवश्‍यक साधने मिळालेली नाहीत. महापालिकेतील बिगारी, वायरमन, सफाई कामगार, व्हॉल्व्हमन, फायरमन, शिपाई आदी चतुर्थश्रेणी कर्मचारी, प्रभाग समिती कार्यालयांतील कर्मचारी, तसेच आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांना महापालिका प्रशासनाकडून मास्कचे वाटप करावे, अशी मागणी महापालिका कामगार संघटनेडून करण्यात आली आहे. 

पोलिसांचे फिरते पथक 
शहरात पोलिसांच्या फिरत्या पथकाने दुकानदारांना व नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले. पोलिसांची वाहने दिसताच दुकानदारांनी स्वतःहून दुकाने बंद करण्यास सुरवात केली.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Itana sanaata kyu hai bahi