#Jaganelive राजर्षी शाहूंचा सहवास अनुभवलेले सेवेकरी

#Jaganelive राजर्षी शाहूंचा सहवास अनुभवलेले सेवेकरी

वडणगे (ता. करवीर) हे पंचगंगेच्या काठावर वसलेले गाव. उत्तरेला जोतिबा डोंगर, पूर्वेकडून वाहणारी पंचगंगा आणि दक्षिणेला कोल्हापूर शहर. शेती हाच मुख्य व्यवसाय. आता गाव जरी सधन असले तरी पूर्वी पावसावर शेती पिकत होती. त्यामुळे अनेकजण पोटासाठी बाहेर पडत. असेच काही जण राजर्षी शाहू महाराज ते राजाराम महाराजांच्या काळापर्यंत नव्या राजवाड्यावर सेवेत होते. त्यांनी प्रत्यक्ष राजांचा सहवास व राजवैभव अनुभवलेले होते.

राधानगरीतील ती थरारक घटना. थरारक या अर्थाने की दिवसभरात तीन जणांचा जीव गेला होता. घटनाही तशीच होती.  जंगबहाद्दर हा तरणाबांड हत्ती मस्तवाल झाला होता. समोर येईल ते तुडवत होता. काही जणांनी त्याला हुसकावत कसाबसा तलावात नेला. तलावापर्यंत जाईपर्यंत दोघांना पायाने तुडवून त्याने चिरडले तर एकट्याला तलावाच्या काठाला दगडावर आपटून मारले.

जंगबहाद्दरचा नेहमीचा माहूत आज नव्हता. तो कोल्हापुरात राजवाड्यात राहिला होता. दादू महाताला राधानगरीत आणेपर्यंत संध्याकाळ होत आली होती. तलावाच्या काठावर गाडी जाताच दादूने उडी मारली आणि काठावर उभा राहून त्याने ‘बहाद्दर ये! बहाद्दर ये! बाळा ये बघू!’ असं म्हणताच तलावाच्या मध्यभागी असलेला जंगबहाद्दर तलावाबाहेर आला आणि दादूला सोंडेने नमस्कार केला. दादू माहूत खाली उतरला आणि शाहू राजांना मुजरा केला. 

साठमारीत तरबेज
दादू माहुताचा मावसभाऊ गणू कांबळे ऊर्फ गणू साठमार हे शाहू महाराजांच्या काळात साठमार म्हणून नावारूपाला आले. साठमारीचा खेळ कोल्हापूर, सोनतळी, राधानगरी येथे चालत असे. मस्तवाल झालेल्या तरुण हत्तीसोबत माणसांचा खेळ या साठमारीत चालत होता. साठमारीच्या खेळात दादू महाताने आपला मावस भाऊ गणू कांबळे याला तरबेज केले होते.

मसूचे कौशल्य पणाला 
राजाराम महाराजांचा २४ घोड्यांचा रथ मसू कोचमीन चालवायचा. एकदा नव्या राजवाड्यावरून राजाराम 
महाराज जुन्या राजवाड्याकडे भवानी देवीला चालले होते. या वेळी रथ हाकत होता मसू कोचमीन. गुजरीजवळ रथ आला आणि अचानक रथाची घोडी एकदम उधळली. रथाचा वेग वाढला. खुद्द राजाराम महाराज रथात होते. मसूने आपले कौशल्य पणाला लावले. गुजरीच्या एका अरुंद बोळात २४ घोड्यांचा रथ घातला आणि तो महाद्वाराला लीलया बाहेरही काढला. 

गोड्यातील निष्णात
राजाराम महाराजांच्या काळातच सदाशिव मान्नाप्पा घोडके हे दरबारी सेवेत होते. त्यांचे मूळ घराणे जाधववाडी (कोल्हापूर)चे. तेथील सदाशिव घोडके नव्या राजवाड्यावर घोड्यांच्या पॅडाकमध्ये कामाला होते. ते वडणगेतील पाटलांच्या घरी दत्तक आले होते. नवख्या घोड्यांना रथाला जुंपण्यासाठी, शिकारीसाठी घोडी आणि शर्यतीसाठी लागणारी घोडी  अशी वेगवेगळी घोडी कसून सराव करून ती तयार करण्यात घोडके निष्णात होते. 

भांडी जमादार
नवा राजवाडा येथील मृदपाकखान्यात भांडी जमादार म्हणून सदाशिव घोडके यांची पत्नी भगीरथी या सेवेत होत्या. मृदपाकखान्यात आचाऱ्यांना, वाढप्यांना जेवण बनविताना वाढण्यासाठी भांडी मोजून देणे आणि भांड्यांची मोजदाद ठेवणे, त्याच्या नोंदी ठेवणे हे काम भगीरथी घोडके यांच्याकडे होते.

अन्य सेवेकरी
सेवकांबरोबरच धोंडी पाटील हे महसूल सेवेत होते. महसूल सेवेत मुख्य नोंदी ठेवण्याचे काम त्यांच्याकडे होते. याशिवाय बापूसाहेब शेलार, ईश्‍वरा घाटगे हे हुजरे होते. महाराजांच्या लवाजम्यासोबत ते कायम सोबत असायचे. बापू धनगर, गणपा रोशन पांडू कुंभार, दादू जाधव यांनीही सेवा बजावली.

शाहू महाराजांनी राज्यकारभारात अनेक जातीच्या लोकांना सामावून घेतले होते. त्यापैकीच वडणगेतील अनेक सेवेकरी हे शाहू महाराज तसेच राजाराम महाराजांच्या सामाजिक समतेचे साक्षीदार होते. या सेवेकऱ्यांनी स्वामिनिष्ठा ठेवून सेवा बजावली. वडणगेसाठी हे नक्कीच  भूषणावह आहे.
- प्राचार्य डॉ. विलास पोवार,
वडणगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com