#Jaganelive जुन्या वाड्यांना चढतोय नवा साज

#Jaganelive जुन्या वाड्यांना चढतोय नवा साज

प्रवेशद्वारासमोर असलेली भली मोठी दगडात नक्षीकाम केलेली चौकट, फूटभर मोठा उंबरठा, करऽऽकरऽऽ वाजणारे दरवाजे, गॅलरीला पुढे असलेले नक्षीदार खांब असा रुबाब असलेले हे वाडे आता मालकांना हजारो रुपये महिन्याला मिळवून देत आहेत. ‘ॲन्टिक’ म्हणून या वाड्यांकडे पाहिले जात आहे. टीव्हीवरील एखादी मालिका असो किंवा चित्रपटातील गाण्याचे किंवा ठराविक क्षणांचे चित्रीकरण असो, या वाड्यांतून होत आहे.

सागवानाचे लाकूड असलेल्या या वाड्यांचा रुबाब आता चित्रीकरणांमुळे आणखी खुलला आहे. या वाड्यांच्या निमित्ताने दिग्दर्शक, निर्माता, प्रसिद्ध अभिनेता, अभिनेत्री येथे येत आहेत. परिणामी त्यांना पाहण्यासाठी, चित्रीकरण पाहण्यासाठी गावात गर्दी होत आहे. पर्यटन आणि गावच्या विकासासाठी, ग्रामपंचायतीलाही हातभार लागत असल्याचे सरपंच नेमगोंडा पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यातील एका बाजूची पण शेतीने समृद्ध असलेली ही गावे आता या वाड्यांमुळे पर्यटनाच्या आणि चित्रपटांच्या यादीत येत आहेत. जुन्या वाड्यांना नवा साज चढत आहे. चित्रीकरणाच्या निमित्ताने त्यांची डागडुजी चांगली होत आहे. या वाड्यांना एक नव्हे, दोन नव्हे तब्बल तीन मजलेही आहेत. ग्रामीण ढंगातील हे वाडे म्हणून आता गावांची समृद्धी ठरत आहेत.

वाड्यांचे मालकही वाड्यांमुळे सर्वांना ओळखू लागले आहेत. गावातील बचत गटांना चहा-नाश्‍त्याचे काम मिळत आहे. गावातील तरुणांना, कलाकारांनाही चित्रीकरणात संधी मिळत आहे. जुने वाडे आता नव्या दमाने छोट्या-मोठ्या स्क्रिनवर दिसत आहेत. काही परदेशी व्यक्ती या टीव्हीतील चित्रीकरण पाहून वाडे पाहण्यासाठी येत आहेत.

चित्रीकरणावेळी वाड्यांबरोबरच अपेक्षित अन्य घरांना, बंगल्यांना, शेतीला, विहिरींनाही मागणी वाढली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मराठीतील ‘तुझ्यात जीव रंगला’ या छोट्या स्क्रिनवरील राणादाचा ‘वाडा’ आणि पाठकबाईंचा ‘पुष्पकुंज’ बंगला होय. यातील वाडा आहे तो गाट कुटुंबीयांचा, तर पुष्पकुंज बंगला आहे तो विजय पाटील-शेरीकर यांचा आहे. त्यांच्या स्वप्नातही नव्हते की, त्यांचा बंगला राज्यातच नव्हे, तर अमेरिकेतही पाहिला जाईल. जुन्या वाड्यांच्या नजराण्यातून त्यांचा बंगला आज चित्रीकरणात घेण्यात  आला. त्यांच्या बंगल्याचे वैशिष्ट्य पाहण्यासाठी थेट परदेशातून पर्यटक त्यांच्या बंगल्यापर्यंत आले. 

‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका सध्या टीव्हीवर गाजत आहे. त्यापैकी पाठकबाईंचा पुष्पकुंज बंगला म्हणजे आमचा बंगला आहे. राणादांचे शेत म्हणजे आमचेच शेत आहे. जुन्या वाड्यांमुळे गावात चित्रीकरण सुरू झाले आणि आमचा बंगला त्यामध्ये घेतला. लोक आज आमच्या बंगल्याजवळ उभे राहून फोटो काढतात. त्यामुळे आमचा बंगला म्हणजे सेल्फी पॉईंट बनला आहे.
- विजय पाटील-शेरीकर,
बंगला मालक. 

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणादाचा जो वाडा आहे तो आमचाच. वाडा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. हा वाडा चित्रीकरणासाठी वापरल्याचा आनंद आहे. या निमित्ताने गावचे नाव पर्यटनासाठी, चित्रीकरणासाठी आणखी गडद झाले.
- पार्श्‍वनाथ गाट,
संजय गाट, जुन्या वाड्याचे मालक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com