जय श्रीरामच्या जयघाेषाने दुमदुमले गाेंदवले

फिराेज तांबाेळी
Tuesday, 29 October 2019

दीपावलीच्या सलगच्या सुट्ट्यांमुळे श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या समाधी दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे.

गोंदवले (जि. सातारा)  :रविवारचा जोडूनच दीपावलीच्या सलग सुट्ट्या आल्याने पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात लोक घराबाहेर पडल्याचे पाहायला मिळत आहे.दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी दर्शनासाठी भाविकांनी गोंदवल्यात गर्दी केली होती. त्यामुळे अवघी गोंदवलेनगरी यात्रामय झाली होती.मात्र दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे भविकांसह सर्वांचीच धांदल उडाली.

 श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या समधी मंदिरात दीपावलीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.या कार्यक्रमासाठी श्रींचे भाविक भक्त आवर्जून हजेरी लावतात.नुकत्याच झालेल्या वसुबारस निमित्त समाधी मंदिर परिसरातील गोशाळेत गोपूजन करण्यात आले.त्यानंतर काल समाधी मंदिर समितीच्या विश्वस्तांच्या हस्ते अक्षय बटव्यातील नाण्यांचे पूजन करून लक्ष्मीपूजन करण्यात आले.मुख्य मंदिरात रांगोळ्या व फुलांनी सजावट करण्यात आली होती.यावेळी अख्खा मंदिर परिसर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला होता.या कार्यक्रमांसाठी देखील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

         साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या बलिप्रतिपदाच्या मुहूर्तावर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या समाधी दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी होती.त्यामुळे समाधी दर्शनासाठी परिसरात भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात आज अनेक भाविकांनी नवीन वाहनांचे पूजन देखील केले.त्यामुळे भविकांबरोबरच नवीन वाहनांची संख्याही अधिक होती.समाधी दर्शनाबरोबरच श्री महाराजांनी स्थापन केलेल्या गावातील थोरले व धाकटे श्रीराम मंदिरातही भाविक दर्शन घेत होते.भाविकांच्या वाढलेल्या गर्दीमुळे अवधी गोंदवलेनगरी यात्रामय झाली होती.
             दरम्यान सलगच्या सुट्ट्यांमुळे गोंदवल्यात भाविकांची गर्दी वाढल्याने सातारा पंढरपूर रस्त्यावरची वाहतूक देखील आज चांगलीच वाढलेली दिसत होती.त्यामुळे बऱ्याचदा रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होण्याचेही प्रकार घडत होते.
           दुपारच्या सुमारास मात्र अचानक पावसाने सुरुवात केल्याने भविकांसह व्यापारी व ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली.यावेळी भाविकांनी मंदिरात आसरा घेतला तर व्यापाऱ्यांना मालाच्या संरक्षणासाठी धावपळ करावी लागली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jai Shriram's chanting slogans in Gōndavalē