
जत पालिकेतील 5 ब ची जागा रिक्त आहे. या जागेसाठी पोट निवडणूक एप्रिल ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणे शक्य आहे.
जत (जि. सांगली) : कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले ज्येष्ठ नगरसेवक इकबाल उर्फ पट्टू गवंडी यांच्या निधनानंतर प्रभाग 5 ब ची जागा रिक्त आहे. या जागेसाठी पोट निवडणूक एप्रिल ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणे शक्य आहे. अनेकांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याने, राजकीय पेच निर्माण झाला आहे. यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत.
दरम्यान, प्रभागातील अनेक ज्येष्ठ मतदारांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी नेत्यांकडे विनवणी केली असून अनेक इच्छुक मंडळी पायाला बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र, वरिष्ठ नेते काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जत नगरपरिषद मध्ये नगराध्यक्षा सह आठ व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सहा तर भाजपचे सात असे पक्षीय बलाबल आहे. कमी अधिक बळ तिन्ही पक्षांना असल्याने अधिक संख्याबळासाठी नेत्यांची ओढ आहे. कॉंग्रेसच्या अधिकृत चिन्हावर ज्येष्ठ नगरसेवक इकबाल गवंडी हे निवडून आले होते. मात्र, गेल्या ऑगष्ट महिन्यात त्यांचे निधन झाले. यानंतर नुकत्याच झालेल्या विषय समितीच्या निवडीत कॉंग्रेसला एका समितीवर पाणी सोडावे लागले. प्रथमच भाजपला सभापती पदाची लॉटरी लागली.
दरम्यान, या जागेसाठी इकबाल गवंडी यांचे चिरंजीव इमरान गवंडी यांना संधी मिळावी, अशी समाजातील काही ज्येष्ठांनी नेत्यांकडे पाठपुरावा केला असल्याचे सांगण्यात येते. तर असंघटित कामगार नेते सलीम गवंडी हे देखील निवडणूकीसाठी इच्छुक आहेत. यासह युवा नेते राजू यादव यांनी मंत्र्यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस मध्ये प्रवेश करून प्रभाग पाचच्या जागेवर अघोषित दावा केला आहे.
यासह युवा नेते योगेश मोटे यांनी ही निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असून सर्वांनी मतदारसंघात जुळवाजुळव सुरू केली आहे. लोकांच्या गाठीभेटी सह नेत्यांकडे शिफारशींचा ओघ लावला आहे. मात्र, यावर नेत्यांनी मौन पाळले असून नेमके नेत्यांची भूमिका काय असणार, यावर वरील इच्छुकांचे भविष्य अवलंबून राहणार आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष
कॉंग्रेस व राष्ट्रवादी भले जत नगरपरिषद मध्ये सत्तेत असले. तरीही नेत्यांमध्ये मतभेद आहेत. यामध्ये निर्णायक भूमिका पार पाडावी लागणार आहे. याचा फायदा भाजपला होणार नाही, याची खबरदारी नक्कीच दोन्ही पक्षाला घ्यावी लागणार आहे. निवडणुकीत भाजपही आपल्या बळाचा वापर करू पाहणार, हे मात्र निश्चित आहे.
संपादन : युवराज यादव