esakal | जत तालुक्‍यात कॉंग्रेसचा "गड आला, पण सिंह गेला'; मोठ्या गावात दणका
sakal

बोलून बातमी शोधा

In Jat taluka Congress got big bash in big villages

जत  तालुक्‍यातील ग्रामपंचायतीत भाजप विरूध्द कॉंग्रेस अशीच लढती झाल्या.

जत तालुक्‍यात कॉंग्रेसचा "गड आला, पण सिंह गेला'; मोठ्या गावात दणका

sakal_logo
By
बादल सर्जे

जत (जि. सांगली) : तालुक्‍यातील ग्रामपंचायतीत भाजप विरूध्द कॉंग्रेस अशीच लढती झाल्या. विशेषतः उमराणी, शेगाव, उटगी, अंकले, वळसंगमध्ये लढती कॉंग्रेससाठी प्रतिष्ठेच्या ठरणाऱ्या होत्या. मात्र, स्थानिक राजकारण व नाराजीचा फटका कॉंग्रेसला सहन करावा लागला. भाजपने संधीचे सोने करत विजयी पताका फडकावली. 

मोठ्या ग्रामपंचायतींत कॉंग्रेसला रोखण्यासाठी भाजपाला राष्ट्रवादीचाही छुपा पाठिंबा राहिल्याची चर्चा रंगली होती. उमराणीत कॉंग्रेसचे मल्लेश कत्ती विरूध्द भाजपचे आप्पासाहेब नामद गटात लढती झाल्या. राष्ट्रवादीची साथ भाजपला मिळाली. 
शेगावला महादेव साळुंखे, निकम सर विरूध्द भाजपचे लक्ष्मण बोराडे यांच्यात काट्याची लढत झाली. दरम्यान, स्थानिक उमेदवारांत असलेले मतभेद व राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा बोराडे गटाला राहिला. त्यामुळे भाजपला 12 तर कॉंग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. 

दरम्यान, उटगीत कॉंग्रेसचे भिमान्ना बिराजदार विरूध्द भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य बसवराज बिराजदार यांच्यात लढती झाल्या. सर्वाधिक 13 जागा भाजपच्या वाट्याला आल्या. अंकलेत कॉंग्रेस नेत्यांचा घर टु घर संपर्काचा अभाव व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील यांच्यात नव्या पीढीसोबतचा नसलेला सुसंवाद पराभवाला कारणीभूत ठरला. 

आज 29 ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले. कॉंग्रेसला 11, भाजपला नऊ व स्थानिक आघाडीला नऊ जागा मिळाल्या. कॉंग्रेसने सर्वाधिक 11 ग्रामपंचायती जिंकून अव्वल क्रमांक पटकावला. मात्र, महत्वाच्या ग्रामपंचायतीत कॉंग्रेसचा झालेला पराभव म्हणजे "गड आला पण सिंह गेला' असाच काहीसा ठरला. 

नेत्यांचे दावे... 

जतमध्ये आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या विरूद्ध माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गटात प्रमुख लढती झाल्या. राष्ट्रवादीने काही ठिकाणी उमेदवार तर काही गावात पॅनेल उभे केले होते. या निकालानंतर कॉंग्रेसने 16 ग्रामपंचायती ताब्यात आल्याचा दावा केला. तर भाजपने 14 ग्रामपंचायतीवर दावा केला. राष्ट्रवादीने 32 सदस्य आणि तीन ग्रामपंचायतीत सत्तेत असल्याचा दावा केला. जनसुराज्यने तीन ग्रामपंचायतीत उमेदवार विजयी झाल्याचे म्हटले आहे. 

संपादन : युवराज यादव

loading image