जत तालुक्‍यात द्राक्ष, डाळिंबावर दावण्या, करप्याचा हल्ला

राजू पुजारी
Monday, 21 September 2020

 जत तालुक्‍यात(जि. सांगली) गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस झाला. त्यामुळे द्राक्ष व डाळिंब बागांना दावण्या, करप्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.

संख :  जत तालुक्‍यात(जि. सांगली) गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस झाला. त्यामुळे द्राक्ष व डाळिंब बागांना दावण्या, करप्या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. बागेतील पाने करपली आहेत. पानगळी झाली आहे. त्यामुळे काड्या तयार झाल्या नाहीत. यावर्षी वेगळ्याच संकटांचा सामना करावा लागणार आहे. याचा मोठा फटका द्राक्ष बागांना बसणार आहे. 

जत तालुक्‍यामध्ये शेतकऱ्यांनी फोंडा माळरानावर द्राक्षबागा उभारल्या आहेत. तालुक्‍यात 11 हजार एकर क्षेत्रावर द्राक्षे बागा आहेत. शेतकऱ्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून द्राक्ष बागा उभा केल्या आहेत. तालुक्‍यात उमदी, बिळूर, तिकोंडी, हळ्ळी, बेळोंडगी, करजगी अंकलगी, संख, भिवर्गी, बालगाव, कागनरी, सिद्धनाथ, आसंगी तुर्क, जालिहाळ खुर्द, बसरगी, गुगवाड, रामपूर,अमृतवाडी, डफळापूर, मुचंडी,जालिहाळ बुद्रुक, शेड्याळ,दरीकोणूर, कोंतवबोबलाद या भागात द्राक्ष बागांची संख्या अधिक आहे. रोगामुळे पानगळी झाल्याने काडी तयार नसल्याने छाटणी घेतल्यास घड न पडण्याची मोठी भीती निर्माण झाली आहे.काही द्राक्षबागेत काडी अजून पूर्ण तयार झाली नाही.त्या अपरिपक्व आहेत.त्यामुळे बागेत कमी माल तयार होणार असल्याने उत्पादनात घट होणार आहे. दोन शेंड्यावर असलेल्या बागांची काडी तयार झाली नाही. या बागेत माल तयार होणार नाही. या बागा फेल जाणार आहेत. 

पूर्व भागातील उमदी,सिध्दनाथ, संख,बालगाव,हळ्ळी,कागनरी,बेळोंडगी जालिहाळ खुर्द,दरीकोणूर,जालिहाळ बुद्रुक या परिसरात बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. दर्जेदार बेदाणाचे निर्मिती केली जाते. त्यामुळे या भागातील द्राक्ष बागायतदार ऑक्‍टोंबर-नोव्हेंबर या महिन्यात छाटणी घेतो. ऑक्‍टोबर छाटणी घेऊन नैसर्गिकरीत्या द्राक्ष उत्पादन घेतो.सुरक्षित द्राक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना छाटणी पंधरा ते एक महिना लवकर घेण्याची वेळ आली आहे. 

फळ छाटणी लवकर 
काही भागात काड्या तयार झाली आहेत.काड्या पिकल्या आहेत.डोळे फुटून येण्याआधी तातडीने फळ छाटणी घ्यावी लागणार आहे. इच्छा नसताना घेण्याची वेळ आली आहे. 

राज्य शासनाने मदत करावी.

वातावरणातील बदलामुळे अनेक बागावर द्राक्षावर करप्या, दावण्या रोगाने बागेतील पाने करपली आहेत. पानगळी झाली आहे. त्यामुळे काड्या तयार झाल्या नाहीत. यावर्षी काही बागेतील द्राक्षे येणार नाहीत. नुकसानीचे पंचनामे करुन राज्य शासनाने मदत करावी. 

- सोमनिंग बोरामणी, द्राक्ष बागायतदार, बेळोंडगी

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Jat taluka, grapes, pomegranates are attacked is attacked by Karapa