Sangli : जत्रा पांगली; जगणं मुश्‍कील झालं! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जत्रा पांगली; जगणं मुश्‍कील झालं!

जत्रा पांगली; जगणं मुश्‍कील झालं!

सांगली : पालं उठली, जत्रा पांगली... दोन वर्षे झाली, पुन्हा ती भरलीच नाही. ती भरली तर पोट भरणार, ती नाहीच भरली तर पोट कशानं भरायचं? आता जगानं वेग घेतला. मंदिरं उघडली, समारंभ सुरू झाले, जेवणावळी झडल्या, मॉल भरले, लोकांनी दिवाळी गर्दीत केली, मग जत्रेवरच संकट का? आता जत्रा भरू द्या, गर्दी होऊ द्या, असं आर्जव यात्रा-उरसावर अवलंबून लोक करीत आहेत. गेल्या दोन वर्षांत त्यांच्या आयुष्याची कसरत सुरू आहे.

मार्च २०२० मध्ये शेवटची यात्रा भरली होती. त्यानंतर जगभरात कोरोना संकटाने डोके वर काढले. लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मध्यल्या काळात काहीवेळ शिथिलता मिळाली, मात्र यात्रा काही भरल्या नाहीत. गर्दी करायला परवानगी मिळणारच नव्हती. यात्रेवर अवलंबून घटकांसाठी ही महासंकटाची घडी राहिली. खेळणी, पाळणे, नारळ-हळद-कुंकू, मिठाईवाले, खाद्यपदार्थ विक्रेते, मनोरंजनाचे कार्यक्रम करणारे हे सारे घटक पोळून निघाले. वर्षातून किमान पन्नास यात्रा करणारी ही मंडळी घरात बसली. काहींचे पाळणे सडून जायला लागले. एका पाळणा संचावर किमान पाच ते सहा लोक अवलंबून असतात. त्यांनी काही ठिकाणी यात्रा भरेल या आशेने दौरे केले, पण लोकांनी पाळणे लावू दिले नाहीत. खेळणीवाल्यांनी छोट्या-मोठ्या बाजारांत, शहरात एखादा कोपरा गाठून दोन-चार रुपये पदरात पडतील, असा प्रयत्न केला. त्यातून कशीबशी हाता-तोंडाची गाठ पडली.

तमाशा, ऑर्केस्ट्रा कलाकारांची कहाणी तर खूप वेदनादायी राहिली. त्यांचे संच मोडले. संकट काळात कलाकारांना सांभाळून ठेवावे म्हणून मालकांनी कर्जे काढली, पण किती काळ टिकणार? अखेर त्यांनीही हात टेकले. आता पुन्हा संच बाधायचा तर सोपे असणार नाही. त्यासाठी यात्रा सुरू झाल्या पाहिजेत. राज्य सरकार अजून सावधपणे निर्णय घेत आहे.

भेळ, दाबेली, चायनीज बनविणारे शेकडो लोक फक्त यात्रा-उरसावर अवलंबून आहेत. दोन वर्षांत हालहाल सुरू आहेत. काहींनी कुठेतरी जागा शोधून तात्पुरता व्यवसाय सुरू केला. मात्र, यात्रा सुरू झाल्याशिवाय सूर लागणार नाही. आता सगळे जग उघडे झाले आहे. यात्रा भरवायला परवानगी द्यायला हवी.

- श्रीरंग जाधव,

भेळ व्यावसायिक

सरकार सावध का?

यात्रेतील व्यावसायिक सतत मोठा प्रवास करतात, खूप ठिकाणी जातात, शेकडो लोकांशी संपर्क येतो, त्यामुळे धोका वाढेल, अशी भीती सरकारला आहे. जगात काही ठिकाणी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभव दिसतो. त्यामुळे थोडी सावधगिरी बाळगली जात आहे. मात्र, त्यातून आता बाहेर पडले तरच या लोकांचे जगणे पुन्हा सुरू होईल.

खायला अन्नाचे वांदे झाले आहेत. दोन वर्षे व्यवसाय बंद आहे. माणसं घरात बसून आहेत. पाळणे सडायला लागले आहेत. दोन-तीन ठिकाणी जबरदस्तीने गेलो, पण अटकाव केला. अशाने जगणे मुश्‍कील झाले आहे.

- मिथुन माने,

पाळणावाले, आटपाडी

loading image
go to top