मदनभाऊंनी जयंतरावांकडे मैत्रीचा हात पुढं केला अन् संघर्षाला पुर्णविराम! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

मदनभाऊंनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर त्यांच्यातील संघर्ष पेटला.

मदनभाऊंनी जयंतरावांकडे मैत्रीचा हात पुढं केला अन् संघर्षाला पुर्णविराम!

सांगली : सन २०१५ ची जिल्हा बँकेची निवडणूक जिल्ह्याच्या राजकारणातील दोन टोकांना एकत्र आणणारी ठरली. एक टोक होते जयंत पाटील तर दुसरे टोक मदन पाटील. एकेकाळी राष्ट्रवादीतील प्रमुख शिलेदार. मदनभाऊंनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर त्यांच्यातील संघर्ष पेटला. एकमेकांची जिरवण्यापर्यंत ताण निघाला. काहीवेळा जयंतरावांची सरशी झाली तर काहीवेळी मदन पाटील पुरून उरले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मात्र मदनभाऊंनी दोन पावले मागे घेत जयंतरावांकडे मैत्रीचा हात पुढे केला आणि एक संघर्ष पर्व संपले.

राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता गेली होती. भाजपचे प्राबल्य वाढले होते, तरीही जयंत पाटील यांचे जिल्ह्यावर पूर्ण नियंत्रण होते. त्यामुळे भाजपही त्यांच्या ओंजळीनेच पाणी प्यायची. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस, भाजपसोबत बैठकांचे फेर सुरु झाले. काँग्रेसकडून तत्कालीन जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, विशाल पाटील, मदन पाटील तर भाजपकडून खासदार संजय पाटील, पृथ्वीराज देशमुख चर्चा करायला पुढे होते. राष्ट्रवादीकडून विलासराव शिंदे यांच्याकडे सूत्रे होती. काँग्रेस तेंव्हाही सात जागांची अपेक्षा बाळगून होती, मात्र शिवसेना आणि भाजपला सोबत घ्यायचे असल्याने जयंत पाटील यांना गणित जमता जमत नव्हते.

हेही वाचा: विधानपरिषद रणधुमाळी : पाटील-महाडिकांचा लागणार कस

काँग्रेसने प्रकरण ताणले. माजी मंत्री पतंगराव कदम यांनी जुळण्याआधीच आघाडी तोडली. एका क्षणात बिनविरोधच्या चर्चा फिस्कटल्या. मदन पाटील यांनी काँग्रेसच्या गोंधळात अडकून पडण्यापेक्षा जयंत पाटील यांच्याशी जुळवून घेण्याला महत्व दिले. त्यावेळी जयंत पाटील जिल्हा परिषद उपाध्यक्षांच्या निवासस्थानी त्रिकोणी बागेजवळ होते. कुणालाही कुणकुण नसताना मदनभाऊंची गाडी त्या परिसरात आली, काळा गॉगल लावलेले भाऊ उतरले आणि अनेकांना धक्का बसला.

हेही वाचा: 'पार्ट टाइम मुख्यमंत्री' या भाजपच्या टीकेला शरद पवारांचे उत्तर

जयंतरावांना भेटायला मदनभाऊ आले, तासभर चर्चा झाली आणि जमले... जयंत पाटील, मदन पाटील, संजय पाटील... तीन पाटलांची एकी आणि कदम एकाकी, असे त्यावेळी बातमीचे मथळे होते. या निवडणुकीत मदनभाऊंचा पराभव झाला. विशाल पाटील यांना त्यांना पराभूत केलेच, शिवाय ‘वसंतदादांचा खरा वारस’, अशा आशयाचे पोस्टर लावून ‘जयंत-मदन’ एकीवर टोलाही लगावला. काँग्रेसने निवडणुकीत सहा जागा जिंकत ताकद दाखवली. पुढे मदनभाऊ राष्ट्रवादीत येणार अशी चर्चा सुरु झाली होती, मात्र त्यांचे अकाली निधन झाले. जयंत-मदन मैत्रीचे पर्व सुरु होण्याआधी संपले.

loading image
go to top