जयंत पाटील जनतेतून निवडून आले, मागल्या दाराने नाही; पडळकरांना प्रत्युत्तर

रवींद्र माने
Tuesday, 26 January 2021

पालकमंत्री जयंत पाटील हे जनतेतून मेरीटवर निवडून आले आहेत, पडळकर मागल्या दाराने निवडून आले आहेत त्यांचे मेरीट काय? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी विचारला आहे.

तासगाव (जि. सांगली) : लोकशाहीत अनुकंपातत्त्वावर नव्हे तर गुणवत्तेवर निवडून येतात हे आमदार पडळकरांना माहीत नसावे त्यांचा अभ्यास कच्चा आहे. पालकमंत्री जयंत पाटील हे जनतेतून मेरीटवर निवडून आले आहेत, पडळकर मागल्या दाराने निवडून आले आहेत त्यांचे मेरीट काय? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी विचारला आहे. प्रसिद्धीच्या झोतात रहाण्यासाठी त्यांची नौटंकी असल्याची टीका त्यांनी केली. असा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी केला.

पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील हे अनुकंपातून झालेले नसते अशी बोचरी टीका केली होती. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी त्या टीकेला प्रत्युत्तर दिले. धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या बिरोबाची शपथ घेऊन समाजाची घोर फसवणूक करणाऱ्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार ? असेही ते म्हणाले.

पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर टीका करण्यापेक्षा पडळकर यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. लोकांनी स्वीकारल्याशिवाय राजकारण करता येत नाही जनतेच्या आशीर्वादावरच राजकारणात सत्ता मिळू शकते. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी राजकारणास सुरवात केल्यापासून जनतेच्या आशीर्वादावर अनेक पदे मिळविली आहेत. जनतेने लाखोंच्या मताधिक्‍याने त्यांना एका उंचीवर नेऊन ठेवले आहे.

जयंत पाटील यांनी केलेल्या विकास कामांसाठी आमदार पडळकर यांच्या शिफारसीची गरज नाही. टीका करत असताना आपण कोठे आहोत याचे भान राहिलेले दिसत नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्याला मानणाऱ्या किती ग्रामपंचायती आणू शकलो हे ही जनतेला सांगावे, अशीही टीका अविनाश पाटील यांनी केली. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayant Patil was elected by the people, not through the back door; Reply to Padalkar