जयंतरावांनी सत्तेच्या बळावर "सर्वोदय'चे सातबारा बदलले

jayant patil and sambhaji pawar.JPG
jayant patil and sambhaji pawar.JPG
Updated on

सांगली- राज्यात सत्तेत येताच जयंत पाटील यांनी सत्याचा गळा घोटून स्वार्थी राजकारण सुरु केले आहे. सर्वोदय साखर कारखान्याचे सातबारा उतारे सत्तेच्या जोरावर त्यांनी बदलून घेतले आहेत, असा आरोप माजी आमदार संभाजी पवार आणि कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

 
राज्य शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत येथील उपजिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारात नसताना तसे आदेश दिले. त्याविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागूच, शिवाय न्यायालयात लढा देऊ. वेळ पडली तर रस्त्यावर उतरून जयंतरावांच्या या कूटनितीला उत्तर देण्याची आमची तयारी आहे, असे खुले आव्हान त्यांनी दिले.

 
ते म्हणाले, ""मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे स्वप्न महाराष्ट्राला दाखवले आहे. त्याला तिलांजली देणारे कृत्य त्यांच्या मंत्रीमंडळातील जिल्ह्याचे पालकमंत्री करत आहेत. त्यामुळे आधी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर ही कूटनिती घालू. सोबत न्यायालयात आम्ही भक्कमपणे लढू, कारण आमचा सत्तेच्या जोरावरील दडपशाहीपेक्षा सत्यावर अधिक विश्‍वास आहे. याआधी सत्यासाठी रस्त्यावर उतरून लढाया केल्या, आंदोलने केली आहे. ते आमच्यासाठी नवे नाही. त्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला तर जयंत पाटील आणि त्यांना गैरमार्गाने साथ देणारे प्रशासनातील अधिकारी जबाबदार असतील.'' 


ते म्हणाले, ""सर्वोदय कारखान्याच्या सातबारा नोंदीबाबत राज्य शासनाचे स्पष्ट आदेश आल्यानंतर पुन्हा सर्वोदयचे नाव नोंदवले गेले होते. त्याचे अपिल स्विकारण्याचा अधिकार सांगलीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना नाहीच, तरीही त्यांनी अपील चालवले आणि त्यावर निकालही दिला. त्यासाठी तीस दिवसांची हरकतीची संधीही दिली नाही. त्यांच्या विरोधात आम्ही दाद मागू. जयंत पाटील यांची कूटनिती नवी नाही, जिल्ह्यातील अनेक नेत्यांना त्याच्या झळा बसल्या आहेत. शेतकऱ्यांची चळवळ संपण्यासाठी त्यांनी जंगजंग पछाडले. शेवटी चळवळीला जवळ घेऊन ती संपवण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांमध्ये त्यांच्याविषयी तीव्र नाराजी आहे. ती रस्त्यावरही दिसेल.'' 

एका व्यासपीठावर या 

पृथ्वीराज पवार यांनी जयंत पाटील यांना खुले आव्हान दिले. ते म्हणाले, ""सर्वोदय कारखान्याची मालकी तुमची आहे, असे दाखवणारा एकजरी कागद तुमच्याकडे असेल तर व्यासपीठावर समोरासमोर या. पी. आर. पाटील म्हणतात, सत्याचा विजय झाला. वास्तवात सत्तेचा वापर करून सत्याची गळचेपी केली आहे. आपण कायद्यालाही झुकवू शकतो, हा अहम जयंतरावांमध्ये आहे. तो आम्ही सत्याच्या मार्गानेच उतरवून दाखवू.''  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com