जयंतराव, उडत्या पाखरांना जिथल्या तिथं रोखा ः प्रदेश उपाध्यक्षांचा सावध इशारा 

अजित झळके
Thursday, 10 December 2020

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रदेशाचे उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी आज महत्वाचा सल्ला दिला. आता सत्ता आली आहे, कणसं खळ्यावर आली आहेत, त्यामुळे उडत्या पक्षांची गर्दी होणार. त्या पाखरांना फार जवळ करत बसू नका, त्यांना जिथल्या तिथं रोखा, असे सांगत सुरेश पाटील यांनी पक्षाच्या निष्ठावंतांचा सन्मान व्हावा, अशी मागणी केली. 

सांगली ः राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रदेशाचे उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी आज महत्वाचा सल्ला दिला. आता सत्ता आली आहे, कणसं खळ्यावर आली आहेत, त्यामुळे उडत्या पक्षांची गर्दी होणार. त्या पाखरांना फार जवळ करत बसू नका, त्यांना जिथल्या तिथं रोखा, असे सांगत सुरेश पाटील यांनी पक्षाच्या निष्ठावंतांचा सन्मान व्हावा, अशी मागणी केली. 

येथील राजमती भवनमध्ये पदवीधर मतदार संघाचे नूतन आमदार अरुण लाड यांच्या सत्काराचा सोहळा सुरेश पाटील यांनी आयोजित केला होता. सकल जैन समाजातर्फे हा सत्कार झाला. त्यावेळी जयंत पाटील यांना त्यांनी सावधगिरीचा इशारा दिला. सांगली शहर आणि जिल्ह्यात जयंत पाटील यांची एकेकाळी एकहाती सत्ता होती. तालुक्‍यांचे प्रमुख नेते जयंतरावांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा बॅंक, बाजार समिती, पंचायत समित्यांवर एकमुखी सत्ती होती. 2014 ला भाजपची लाट आली आणि लोक सोडून गेले. पक्ष जवळपास मोकळा झाला. 

त्याचा संदर्भ देत सुरेश पाटील म्हणाले, ""एकेक शिलेदार सोडून जात असताना शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळवून दिले. त्यांनी त्यासाठी घेतलेले कष्ट प्रचंड आहेत. राज्यात काहीच संधी नसताना सरकार आणले आणि ते आता उत्तम सुरु आहे. अशावेळी कणसं खळ्यावर आल्याचं पाहून पाखरं पुन्हा येतील. जी काल उडून गेली होती, ती भिरभिर करतील. ही पाखरं आज येतील, पुन्हा उद्या निघून जातील, त्यांचा भरवसा नाही. अशा उडत्या पाखरांना जिथल्या तिथं रोखा. ज्या निष्ठावंतांनी पक्ष संकटात असताना साथ दिली, त्यांचा सन्मान करा. त्यांना योग्य ठिकाणी संधी द्या.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayantrao, stop the flying birds wherever they are: State Vice President's warning