झुलेलाल चौक गतवर्षी महापुरात, आज कोरडा ठाक

बलराज पवार 
Wednesday, 12 August 2020

गतवर्षी याच काळात सांगली जिल्ह्यात महापुराचा हाहाकार सुरु होता. 11 ऑगस्ट 2019 रोजी झुलेलाल चौकात एनडीआरएफच्या बोटी महापुराच्या पाण्यात फिरत होत्या.

सांगली : गतवर्षी याच काळात सांगली जिल्ह्यात महापुराचा हाहाकार सुरु होता. 11 ऑगस्ट 2019 रोजी झुलेलाल चौकात एनडीआरएफच्या बोटी महापुराच्या पाण्यात फिरत होत्या. आज हा चौक कोरडा ठाक होता. गेल्या वर्षी 25 जुलै ते 11 ऑगस्ट या काळात कोयना धरणात 108 टीएमसी पाण्याची आवक झाली होती. यंदा याच कालवधीत अवघे 26 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 82 टीएमसी इतकी पाण्याची आवक कमी झाली आहे. 

सांगली, सातारा आणि कोल्हापूरला धडकी भरवणारा महापूर गतवर्षी आला होता. पावसाने थैमान घातल्यामुळे कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस झाला. महाबळेश्‍वरमध्ये तर सुमारे सात हजार मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. देशात सर्वाधिक पावसाची नोंद झाली होते. या तुलनेत पावसाने यंदा चांगलीच ओढ दिल्याने सरासरीपेक्षाही तेथे पाऊस कमी झाला आहे. त्याचबरोबर कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक संथगतीने होत आहे. गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे कोयना धरणात दिवसाला चार टीएमसी इतके पाणी येत होते. तर आज गेल्या 24 तासात केवळ एक टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. ही आवक गतवर्षीच्या तुलनेत अवघी 25 टक्के आहे. शिवाय त्यावेळच्या पावसाच्या तुलनेत केवळ 33 टक्केच पाऊस झाला आहे. 

गतवर्षी 25 जुलै ते 11 ऑगस्ट या काळात कोयना धरणात 108.80 टीएमसी इतकी पाण्याची आवक झाली होती. म्हणजे कोयना धरणाच्या क्षमतेपेक्षा जास्त पाणी त्यावेळी पंधरवड्यात झाली होती. याच काळात यंदा मात्र केवळ 26.54 टीएमसी इतकी पाण्याची आवक झाली आहे. आज सायंकाळपर्यंत कोयना धरणात 75.77 टीएमसी इतका पाणीसाठा होता. पाणलोट क्षेत्रातून धरणात ताशी 20581 क्‍युसेक्‍स या संथगतीने पाण्याची आवक सुरु होती. सध्या धरण 71.99 टक्के इतके भरले आहे. 

यावर्षीचा एकूण पाऊस 2768 मिलीमीटर नोंदला गेला आहे. याच काळात गतवर्षी 5405 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. यावरुन गतवर्षीच्या पुराचे कारण लक्षात येईल. तर गेल्या वर्षी धरणाची पाणीपातळी 103.40 टीएमसी इतकी होती. म्हणजे धरण पुर्ण भरले होते. यंदा धरण भरण्यास आणखी किती काळ जाणार हे सांगता येत नाही अशी स्थिती आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jhulelal Chowk was flooded last year, today it is dry