

तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात परतीचा पाऊस जोरदार होतो, ही काही वर्षांपर्यंतची ओळख होती. जूनमध्ये दमदार पाऊस होऊ लागल्याने जिल्ह्यातील खरिपाचे क्षेत्र आपोआप वाढले होते. या वर्षी जूनच्या पावसाने सोलापूरच्या बहुतांश तालुक्यांना दगा दिला. आता सर्वांच्या नजरा जुलैमधील पावसाकडे लागल्या आहेत. जुलै महिन्यातील पाऊसही सोलापूरसाठी बेभरोशाच राहिलेला आहे. कधी दमदार, तर कधी किरकोळ पाऊस या महिन्यात झालेला आहे.
गेल्या वर्षी मेपासून सुरू झालेला पावसाळा अक्षरशः ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत सुरू होता. महापूर आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्याला यंदा मे-जूनपर्यंत फारशी पाणीटंचाई जाणवली नाही. यावर्षी जून महिन्यात पावसाने दगा दिला. जुलै उजाडला तरीही वातावरणात फारसा काही बदल झालेला नाही. त्यामुळे आता दुष्काळाची भीती निर्माण होऊ लागली आहे. जुलैच्या पावसाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पावसाळ्यातील तिसऱ्या पुनर्वसू नक्षत्राला सोमवारपासून (ता. ६) सुरुवात होत आहे. यंदाचे मृग नक्षत्र कोरडे गेले. आर्द्रा नक्षत्रात २८ जूनला जिल्ह्याच्या काही भागांत दमदार पाऊस झाला. हा अपवाद वगळता यंदाचा पावसाळा अद्याप कोरडाच असल्याचे दिसत आहे. जूनमध्ये जिल्ह्यात सरासरी १०२.५ मिलिमीटर पाऊस होतो. यंदा ८२.५ मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे.
सरासरीच्या ८० टक्के पाऊस जिल्ह्यात झाला आहे. जुलै महिन्यात सोलापूर जिल्ह्यात सरासरी ९४.८ मिलिमीटर पाऊस होतो. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ८४.३ मिलिमीटर पाऊस झाला होता. सरासरीच्या ८८.९ टक्के पाऊस गेल्या वर्षी जुलैमध्ये झाला होता. जूनमध्ये वेळेवर पाऊस न झाल्याने त्याचा थेट परिणाम खरिपाच्या पेरण्यांवर झाला आहे. एकीकडे पेरण्या खोळंबल्या असताना, दुसरीकडे आता पाणीटंचाईची टांगती तलवार सोलापुरकरांच्या डोक्यावर आहे.
जुलैमधील पाऊस (मिमीमध्ये)
२०२५ : ८४.३ मिमी
२०२४ : १०५.५ मिमी
२०२३ : २८९.३ मिमी
२०२२ : २३६.१ मिमी
२०२१ : १४५.१ मिमी
२०२० : २९०.८ मिमी
२०१९ : ५९.६ मिमी
२०१८ : ३९.५ मिमी
२०१७ : १८.६ मिमी
२०१६ : २३२.८ मिमी
119 वर्षातील जुलैमधील पावसाचे विक्रम
जुलैमध्ये सोलापुरात २४ तासांत सर्वाधिक १६०.३ मिलिमीटर पावसाची नोंद १६ जुलै १९०७ रोजी झाली होती. संपूर्ण जुलै महिन्यात सर्वाधिक ३६९.६ मिलिमीटर पावसाची नोंद १९८९ मध्ये झालेली आहे. जुलैमधील पावसाचे हे विक्रम आजही कायम आहेत. अलीकडच्या काळात जुलै महिन्यातील सर्वात कमी १५.५ मिलिमीटर पावसाची नोंद २०१४ मध्ये झालेली आहे. यावर्षीचा जुलै महिना सोलापूरसाठी कसा जातो, यावर जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.