लाखो भाविकांचे कुलदैवत

निवास मोटे
सोमवार, 10 एप्रिल 2017

‘दख्खनचा राजा’ श्री जोतिबा, सौदागर, जोतिर्लिंग, रवळनाथ या नावांची बिरुदे भक्तिभावाने ज्याला अर्पण केलीत, असा देवाधिदेव वाडी रत्नागिरीचा जोतिबा म्हणजे केदारलिंग होय. कोल्हापूरच्या वायव्येस १८ किलोमीटरवर जोतिबा डोंगर म्हणजे वाडी रत्नागिरीचे जोतिबा देवस्थान प्रसिद्ध आहे. 

सह्याद्रीचा जो फाटा पन्हाळगड, पावनगड असा गेला आहे, त्याला पुढे सोंडेसारखा शंखाकृती भाग जो वर गेला आहे, तोच जोतिबाचा डोंगर होय. प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले जोतिबाचे पुरातन मंदिर या ठिकाणी आहे. समुद्रसपाटीपासून ३१०० फूट उंचीवरील जोतिबा डोंगराचा परिसर सौंदर्याने नटलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या वैभवात, भौतिक व ऐतिहासिक ऐश्‍वर्यात मोलाची भर घालणारा या देवालयाचा परिसर आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांतील लाखो भाविकांचे जोतिबा हे कुलदैवत आहे. डोंगरावरील उंच-सखल भागांमध्ये वाडी रत्नागिरी गावठाण आहे. सहा हजार या गावाची लोकसंख्या असून ९० टक्के लोक गुरव (पुजारी) समाजाचे आहेत. देवाचे धार्मिक कार्य, नारळ, गुलाल, खोबरे, मेवामिठाई, हॉटेल यावर त्यांची उपजीविका चालते.

दरवर्षी एप्रिल महिन्यात चैत्र पौर्णिमेला जोतिबा डोंगरावर विराट यात्रा भरते. राज्यातून सुमारे सहा-सात लाख भाविक या यात्रेसाठी येतात. गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जोतिबा यात्रेचा शुभारंभ होतो. कामदा एकादशीस भाविक यात्रेसाठी येण्यास सुरुवात होते. गुढी पाडव्यास निगवे दुमाला (ता. करवीर) येथील हिम्मतबहाद्दूर चव्हाण-सरकार यांची मानाची सासनकाठी सदरेजवळ उभी करण्यात येते. गुढी पाडव्यानंतर बेळगाव (कर्नाटक) येथील भाविक पायी येण्यास प्रारंभ करतात. बेळगावमधील चव्हाट गल्ली व नार्वेकर गल्लीतील भाविक बैलगाड्या घेऊन पायी मोठ्या संख्येने येतात. ते कामदा एकादशीस जोतिबावर पोचतात. त्यांना मानाचा विडा देऊन स्वागत करण्यात येते. हे भाविक तंबू मारून डोंगरावर राहतात. पायी येण्याची या भाविकांची पिढ्यान्‌ पिढ्यांची परंपरा आहे.

जोतिबावर मानाच्या ९६ सासनकाठ्या असून त्या यात्रेच्या आदल्या दिवशी डोंगरावर येतात. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा जयघोष करीत मंदिर परिसरात येतात. मुख्य मंदिराभोवती प्रदक्षिणा काढून त्या मंदिराभोवती उभ्या केल्या जातात.

मानाच्या सासाकाठ्यांचे पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती पानाचा विडा देऊन स्वागत करते.

मुख्य चैत्र यात्रेदिवशी पहाटे श्रींना शासकीय महाभिषेक पन्हाळ्याचे तहसीलदारांच्या प्रमुख हस्ते घालण्यात येतो.

या वेळी विविध शासकीय अधिकारी, ग्रामस्थ, पुजारी उपस्थित असतात. त्यांच्याकडून श्रींची अलंकारित सरदारी खडी महापूजा बांधली जाते.

दुपारी दीड वाजता कोल्हापूरचे पालकमंत्री, जिल्ह्याचे इतर मंत्री, आमदार, खासदार यांच्या हस्ते सासनकाठी मिरवणुकीस प्रारंभ होतो. या वेळी सासनकाठ्या, हलगी, पिपाणी, सनईच्या सुरांवर नाचविल्या जातात. विविध गीतांच्या चालीवर भाविक काठ्या घेऊन बेधुंदपणे नाचतात. या काठ्या ३० ते ५० फूट उंचीच्या असतात. बांबूच्या तळापासून चार-पाच फुटांवर एक आडवी फळी असते. त्यावर जोतिबाचे वाहन घोडा बसविलेला असतो. विविध रंगी सासनकाठ्यांमुळे जोतिबा मंदिरास शोभा येते.

चैत्र यात्रे दिवशी हस्त नक्षत्रावर देवाची पालखी काढली जाते. त्यापूर्वी चांदीची पालखी आकर्षक फुलांनी सजवून त्यात श्रींची उत्सवमूर्ती ठेवली जाते. देवभावी तलाजावळ तोफेची सलामी दिल्यानंतर पालखी मंदिरातून बाहेर येऊन ती यमाई मंदिराकडे जाण्यास निघते. 

या वेळी लाखो भाविक पालखीवर गुलाल, खोबऱ्याची उधळण करतात. खोबऱ्याची उधळण, गुलाल पालखीवर फेकली जाणारी बंदी नाणी हे सर्व दृश्‍य अगदीच अनोखे व पाहण्यासारखे असते. सर्व जोतिबा डोंगर गुलालमय दिसतो. चेहरे गुलालाने माखलेले दिसतात.

पालखी गजगतीने सायंकाळी सात-साडेसात वाजता श्री यमाई मंदिराकडे जाते. यमाई मंदिरात विविध धार्मिक विधी होतात. नयनरम्य आतषबाजी करण्यात येते.

पालखी सोहळा झाल्यावर भक्त आपापल्या गावी रवाना होतात. चैत्र यात्रेनंतर पाच रविवारी जी यात्रा भरते, त्या यात्रेस ‘पाकाळणी’ असे म्हणतात. ज्यांना चैत्र यात्रेस येण्यास मिळाले नाही, ते पाकाळणीस येऊन पालखी व शिखरांवर गुलाल-खोबरे टाकून दर्शन घेऊन परततात.

दरम्यान, यात्रेत चार दिवस गायमुख तलाव या ठिकाणी कोल्हापुरातील सहज सेवा ट्रस्टचे अन्नछत्र असते. तसेच जोतिबा एसटी बसस्थानक परिसरात आर. के. मेहता चॅरिटेबलच्या वतीने मोफत अन्नछत्र असते. या अन्नछत्राच्या ठिकाणी महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांच्या झुंडीच्या झुंडी जातात. या अन्नछत्रामुळे भाविक तृप्त होतात.

Web Title: jyotiba darshan