esakal | कडकनाथ प्रकरण महागात; 'महारयत'ची बँक खाती सील
sakal

बोलून बातमी शोधा

कडकनाथ प्रकरण महागात; 'महारयत'ची बँक खाती सील

महारयत ऍग्रो कंपनीवर कडकनाथ कोंबडीपालन प्रकल्पाच्या बहाण्याने व्यावसायिकांची चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याच्या तपासात शाहूपुरी पोलिसांनी आज कंपनीचे खाते असलेली बॅंकेची दोन खाती गोठवली. यामध्ये सुमारे एक कोटीची रक्कम होती. त्यांच्या अन्य खात्यांचीही चौकशी सुरू आहे. 

कडकनाथ प्रकरण महागात; 'महारयत'ची बँक खाती सील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर ः महारयत ऍग्रो कंपनीवर कडकनाथ कोंबडीपालन प्रकल्पाच्या बहाण्याने व्यावसायिकांची चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याच्या तपासात शाहूपुरी पोलिसांनी आज कंपनीचे खाते असलेली बॅंकेची दोन खाती गोठवली. यामध्ये सुमारे एक कोटीची रक्कम होती. त्यांच्या अन्य खात्यांचीही चौकशी सुरू आहे. 

कंपनीचे पदाधिकारी सुधीर शंकर मोहिते आणि संदीप सुभाष मोहिते (दोघेही, रा. इस्लामपूर, जि. सांगली) यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. तपासात कंपनीचे आर्थिक व्यवहार, शेतकरी आणि व्यावसायिकांबरोबर केलेल्या करारांची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी कंपनीच्या कार्यालयाची झडती घेतली असून, काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. कंपनीची इस्लामपूर येथे खासगी बॅंकांमध्ये खाती आहेत. यापैकी एका बॅंकेतील दोन खात्यांची पोलिसांनी तपासणी केली. एका खात्यावरील 30 लाख 95 हजार रुपये, तर दुसऱ्या खात्यावरील 63 लाख 57 हजार रुपयांची रक्कम शिल्लक आहे. पोलिसांनी बॅंक अधिकाऱ्यांशी चर्चा करून दोन्ही खाती गोठवली.

कंपनीची अन्य बॅंकांमध्येही खाती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. संशयित सर्व बॅंक खात्यांची चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली. दरम्यान, इस्लामपूरमध्येही "महारयत'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने इस्लामपूर पोलिसांकडूनही तपास सुरू आहे. कंपनीच्या संस्थापकांपैकी एका संशयितास पोलिसांनी अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे. 

loading image
go to top