कडेगावला चार वर्षात एकही मोठे काम झाले नाही

संतोष कणसे
Thursday, 14 January 2021

कडेगाव नगरपंचायतीत सत्ताधारी आणि विरोधक हातात हात घालून शहराचा "गाडा' हाकत आहेत. तरीही चार वर्षात शहरांत एकही मोठे काम झालेले नाही. त्यामुळे नागरिकांत नाराजी आहे. मोठी विकासकामे राबवली जावीत, अशी मागणी जोर धरु लागली आहे. 

कडेगाव : कडेगाव नगरपंचायतीत सत्ताधारी आणि विरोधक हातात हात घालून शहराचा "गाडा' हाकत आहेत. तरीही चार वर्षात शहरांत एकही मोठे काम झालेले नाही. त्यामुळे नागरिकांत नाराजी आहे. मोठी विकासकामे राबवली जावीत, अशी मागणी जोर धरु लागली आहे. 

सत्ताधारी व विरोधकात नेहमी विळ्या-भोपळ्याचे सख्य असते. हे जगजाहीर असले तरी कडेगाव नगरपंचायत अपवाद ठरली आहे. कोणत्याही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सत्ताधारी-विरोधकांनी एकत्रच आले पाहिजे. परंतु गेल्या चार वर्षात किरकोळ कामे वगळता भरीव वा मोठे काम झालेले नाही. सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांच्या भूमिकेबाबत नागरिकांच्या मनात प्रश्न असल्याचे चित्र आहे. 
नगरपंचायतीतील सत्ताधारी व विरोधकांचा निवडणूक जाहीरनामा काढून पाहिला शहर विकासाची गाडीभर आश्वासने दिलेली दिसतील. 

सध्याचे चित्र पाहिले तर सत्ताधाऱ्यांचे शहर विकासाकडे दुर्लक्ष झाल्याने म्हणावे लागते. सत्ताधाऱ्यांनी शहर विकासाकडे केलेल्या दुर्लक्षाबाबत विरोधकांनी आवाज उठवला पाहिजे. हे तर विरोधी पक्षाचे कर्तव्यच. शहरात विकास कामे करण्यासाठी विरोधी पक्ष व विरोधी पक्षनेत्यांनी सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडणे गरजेचे असते. मात्र विरोधी पक्षाने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. 

रस्ते, नवीन पाणी पुरवठा योजना, हद्दवाढसह पायाभूत सुविधांचा अभाव असताना सत्ताधारी, विरोधकांच्या भूमिकेमुळे शहरविकासाला खीळ बसल्याची चर्चा जाहीरपणे होत आहे. नगरपंचायतीची निवडणुक जवळ आल्याने नागरिकांनीही आतापर्यंत किती विकास झाला ? सत्ताधारी व विरोधकांनी आपपली भूमिका कितपत पार पाडली याचे "ऑडिट' सुरु केले आहे. 

नगरपंचायतीत कॉंग्रेसची सत्ता आहे. कॉंग्रेसचे नेते डॉ. विश्वजित कदम राज्यमंत्री आहेत. डॉ. कदम कडेगावच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी आग्रही आहेत. आमदार मोहनराव कदम, पदवीधर मतदार संघाचे अरुण लाड यांच्या माध्यमातून विकासाला चालना मिळू शकते. मोठ्या योजना राबविणे गरजेचे असताना किरकोळ कामांवर सत्ताधारी-विरोधकांकडून एकमत झाले आहे काय ? असा सवालही नागरिक उपस्थित करु लागलेत. 

विरोधकांची कतर्व्यात कसूर 
निवडणूकीसाठी अजून वर्ष आहे. सत्ताधाऱ्यांनी शहरात मोठ्या प्रमाणात विकास योजनांची अंमलबजावणी करुन चौफेर विकास करावा. सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्ष झाल्यास विरोधकांनी भूमिका पार पाडावी. आवाज उठवला तरच कडेगावचा चेहरा मोहरा बदलेल. कडेगावची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरु होईल. 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kadegaon has not done any major work in four years