केजमधून अपहरण झालेल्याचा मृतदेह सापडला ‘हिरण्यकेशी’त

आर्थिक व्यवहारातून खून झाल्याचा संशय
murder
murderesakal

गडहिंग्लज: लव्हारी केज, जि. बीड येथून अपहरण करून आणलेल्या एकाचा मृतदेह गडहिंग्लज तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवरील नांगनूर बंधाऱ्याजवळ पाण्यात पोत्यात बांधलेल्या स्थितीत आढळला. सुधाकर हनुमंत चाळक (वय ५५) असे मृताचे नाव आहे. ऊसतोड टोळीच्या व्यवहारातून त्याचा खून झाल्याचा संशय बीड पोलिसांनी व्यक्त केला.

याबाबतची बीड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी केज पोलिस ठाण्यात चाळक यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात बीडमधूनच दोघांना केज पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक तपासात या प्रकरणात कडगाव (ता. भुदरगड) येथील एकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, केजमधून आज चार पोलिस कर्मचारी संशयितांना घेऊन आधी कडगावला दाखल झाले. तेथून त्या गावातील एका संशयिताला ताब्यात घेतले. चाळकच्या अपहरणाबाबत अधिक चौकशी केली असता त्याचा मृतदेह गडहिंग्लज तालुक्यातील नांगनूरजवळच्या हिरण्यकेशी नदीवरील बंधाऱ्यात टाकल्याचे तिघांनी कबूल केले. यामुळे केजचे पोलिस तिन्ही संशयितांसह गडहिंग्लजमधील पोलिसांची मदत घेऊन नांगनूरला पोचले. हा बंधारा कर्नाटक हद्दीत असल्याने संकेश्वर पोलिसांचीही मदत घेण्यात आली.

आज दुपारपासून मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते. ते पाहण्यासाठी बंधाऱ्याजवळ परिसरातील शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. अखेर रात्री उशिरा एक गाठोडे पाण्यातून मिळून आले. त्याची पाहणी केली असता त्यात चाळकचा मृतदेह आढळला. संशयितांनी तो मृतदेह ओळखला. जागेवरच शवविच्छेदन करण्याच्या हालचाली रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. या घटनेला गडहिंग्लज पोलिसांनी दुजोरा दिला.

दरम्यान, चाळक ऊसतोड मजुरांच्या टोळ्या पुरवठा करण्याचे काम करीत असल्याचे समजते. तीनपैकी एका संशयिताने ऊसतोड टोळीसाठी चाळक याच्याकडे लाखोंची रक्कम ॲडव्हान्स दिली होती; मात्र चाळकने टोळी पाठवलीच नाही. पैसेही देण्यास टाळाटाळ करीत होता. या प्रकरणातूनच चाळक याला अन्य दोन संशयितांच्या मदतीने इकडे आणून त्याचा घातपात केल्याचा संशय केज पोलिसांचा आहे.

घरी फोन करून १२ लाखांची मागणी

बीड: चाळक हा केज तालुक्यातील लव्हुरी महालक्ष्मी साखर कारखान्यावर कामगार पुरवठा अधिकारी पदावर खासगी नोकरीस आहेत. ते १६ फेब्रुवारला सकाळी दहाच्या सुमारास बेपत्ता झाले होते. या संदर्भात केज पोलिस ठाण्यात नोंद आहे. त्यांचा शोध सुरू असताना २७ फेब्रुवारीला दुपारी सव्वाबाराच्या सुमारास चाळक यांनी त्यांचा मुलगा अक्षय याला दूरध्वनी करून १२ लाख रुपये घेऊन संकेश्वर साखर कारखान्यावर ये, असे सांगून फोन बंद केला. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास दुसरा मुलगा विशाल याला फोन करून बारा लाख रुपये घेऊन येण्यास चाळक यांनी सांगितले. नंतर बाजूच्या व्यक्तीने फोन घेऊन हिंदीतून ‘तुम्हारा पापा गरीब लोगों का पैसा लेके गया है, पैसा वापीस नहीं लाया, तुम तुम्हारी जमीन बेचकर पैसा कर्नाटक को लेके आवो,’ असे सुनावले. फोन सुरू असताना चाळक यांना मारहाण केल्याने त्यांचा रडण्याचा आवाज येत होता. नंतर पैसे आणून द्या, नाही तर तुझ्या वडिलांना जीवेच मारून टाकू, अशी धमकी दिली. यावरून आर्थिक व्यवहारातून चाळक यांचे अपहरण झाल्याचे लक्षात आल्याने अक्षय यांनी फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

बीड... कडगाव... गडहिंग्लज

दरम्यान, चाळक याचे अपहरण बीड जिल्ह्यातून करून त्याला कडगावमार्गे गडहिंग्लज तालुक्यातील देसाईच्या नातेवाईकाकडे ठेवले होते, अशीही एक माहिती समोर येत आहे. यामुळे चाळक याचा घातपात नेमका कुठे व कसा झाला, याचा तपास बीड पोलिस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com