आई-बहिणीच्या मृत्यूनंतरही ती गायली...

kajal narute performs song after her family s death
kajal narute performs song after her family s death

कोल्हापूर : "डोळ्यादेखत बोट पलटी झाली. आई व बहिणीचा मृत्यू डोळ्यासमोर झाला. आजही घरी एकटी असले की, आई व बहीण‌ घरात असल्याचा भास होतो. त्यांच्या आठवणीने गहिवरून येतं. हुंदकाही आवरता येत नाही. आईचं स्वप्न होतं की, मी मोठी गायिका व्हावं. त्यामुळेच आई व बहिणीच्या मृत्यूनंतर पंधराव्या दिवशी सांगलीतील एका कार्यक्रमात माझा हुंदका आवरुन त्याला स्वरांचा साज चढवला. आता मी ठरवलंय की, आईचं स्वप्न पूर्ण‌ करेपर्यंत डोळ्यांतील अश्रूंना‌ थांबवायच." दीड महिन्यापूर्वी महापुरात ब्रह्मनाळ येथे बोट पलटी होऊन झालेल्या अपघातातील नरुटे कुटुंबियातील काजल नरुटे सांगत होती.

महापुराचे पाणी ब्रह्मनाळमध्ये शिरले होते. गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत होते. काजलची आई सुरेखा, बहीण कोमल, चुलत आजी, मामी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी बोटीत चढल्या. बोटीत जागा नसल्याने काजल घराच्या दारातच थांबली. काही अंतरावर बोट गेल्यानंतर टर्न घेताना ती पलटी झाली. काहीतरी घडल्याचं काजलला दिसत होते. पाण्याला ओढ असल्याने काही करताही येत नव्हते. या अपघातात नरुटे कुटुंबियातील सतरा जणांचा मृत्यू झाला. त्याचा धक्का काजलला बसला. ती आई व बहिणीच्या मृत्यूने सैरभैर झाली. घरात बसल्यानंतरही तिला त्यांची आठवण सतावू लागली. अशातच गणेशोत्सवादरम्यान सांगलीत गायनाचा कार्यक्रम आला. स्वतःला दुःखातून सावरायच तर गायनातून आईचं स्वप्न पूर्ण करायच, असे ठरवून ती आई व बहिणीच्या  मृत्यूनंतर पंधराव्या दिवशीच स्टेजवर गायली.

काजलचे प्राथमिक शिक्षण ब्रह्मनाळ विद्यालय, तर राणी सरस्वती कन्या महाविद्यालयातून ती बारावी उत्तीर्ण झाली. सांगलीवाडीतील पतंगराव कदम कॉलेजमधून तिने बी.एस्सी. (फिजिक्स) मिळवली. तिला लहानपणापासूनच गायनाची आवड. रेडिओ व टीव्हीवरील हिंदी, मराठी गाणी ऐकत ती लहानाची मोठी झाली. कोणतेही शास्त्रीय शिक्षण न घेताही तिचे गोड गाणे ऐकण्यासाठी आई आतुर असायची. काही वर्षांपूर्वी तिने एम. आर. सावंत यांच्याकडे क्लासिकल गायनाचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. बीट टू बीट डान्सची ती नृत्यकला कलाकार आहे‌. ओंकार रोकडे यांच्याकडे तिने नृत्याचे धडे गिरवले आहेत.

विशेष म्हणजे तिने महाविद्यालयीन जीवनात युवा महोत्सव गाजवला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या सांस्कृतिक पथकात तिने आपला करिष्मा दाखवला आहे. म्हैसूर येथे झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवात तिचा सहभाग असलेल्या लोकनृत्य प्रकाराने सुवर्ण, तर रांची येथे झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवात वेस्टर्न साॅंग प्रकारात सुवर्ण, इंडियन सॉंग व वन अॅक्ट‌ प्ले प्रकारात रौप्यपदक मिळवले आहे. इंदूर (मध्य प्रदेश) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय युवा महोत्सवात फोक ऑर्केस्ट्रामध्येही तिचा सहभाग होता. 

काजलची बहीण कोमल बी‌. एस्सी.चे शिक्षण घेत होती. ती हुशार होती. तिचा मोठा भाऊ चंद्रशेखर सांगलीतील मार्केट यार्डमध्ये कामाला आहे. आता आम्ही दोघे एकमेकांचे आधार आहोत, असे काजल सांगते.

शिवाजी विद्यापीठाने युवा महोत्सव जाहीर केला आहे. त्याची जय्यत तयारी सुरू आहे. काजलही युवा महोत्सवासाठी कलाकारांची तयारी करून घेत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com