esakal | कळमकरांच्या कादंबरीमुळे पिलम भटाची आठवण ः  डॉ. सदानंद मोरे 
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay kalamkar

विनोदी साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांच्या "एका स्वर्गस्थ देशाची गोष्ट' या कादंबरीचे प्रकाशन आज सावेडीतील कोहिनूर मंगल कार्यालयात झाले.

कळमकरांच्या कादंबरीमुळे पिलम भटाची आठवण ः  डॉ. सदानंद मोरे 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर :  """एका स्वर्गस्थ देशाची गोष्ट' या कादंबरी लेखनात डॉ. संजय कळमकर यांनी नवीन विषय हाताळत असतानाही स्वतःची लेखनशैली मात्र टिकवून धरली आहे. डॉ. कळमकरांचे पुस्तक विनोदी राजकीय कादंबरी लिखाणाचा पॅटर्न बनेल, असा विश्‍वास अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्‍त केला. 


विनोदी साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांच्या "एका स्वर्गस्थ देशाची गोष्ट' या कादंबरीचे प्रकाशन आज सावेडीतील कोहिनूर मंगल कार्यालयात झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दादा कळमकर होते. या वेळी आमदार लहू कानडे, ग्रंथाली प्रकाशनाचे विश्‍वस्त सुदेश हिंगलासपूरकर, ज्ञानदेव पांडुळे, मोहिनीराज गटणे, जयंत येलूलकर, किशोर मरकड, कवी चंद्रकांत पालवे, प्रा. मेधा काळे, बाळासाहेब मिसाळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस शशिकांत नजान, श्रेणिक शिंगवी, मृणाल कुलकर्णी व गणेश लिमकर यांनी कादंबरीचे प्रकट वाचन केले. डॉ. कळमकर यांची ही बारावी कादंबरी आहे. 


डॉ. सदानंद मोरे म्हणाले, ""भारताने 2020मध्ये महासत्ता होण्याचे स्वप्न पाहिले होते. अजूनही ते पूर्ण झालेले नाही. त्याला राजकारणही एक कारण असू शकेल. त्याचे परीक्षणात्मक लेखन होणे आवश्‍यक होते. निवडणुकांत महाभारतासारखाच प्रकार असतो. त्यांनी आजच्या जगातील महाभारतच कादंबरीतून मांडले आहे. महाभारताच्या संजयची उणीव संजय कळमकर यांनी पूर्ण केली. प्रत्येक धर्मात देव असतो. देव माणसांत येतात व माणूस सर्वांत जातो, असे कथानक पुराणांपासून ग्रीक साहित्यापर्यंत वाचनात येते. हेच कथासूत्र घेऊन डॉ. कळमकरांनी कादंबरीची मांडणी केली आहे. संत एकनाथ यांच्या भारुडांप्रमाणे विनोदी शैलीत समाजातील दोषांवर ही कादंबरी चपखल बोट ठेवते. त्यांच्या कादंबरीने प्र. के. अत्रे यांच्या "पिलम भटा'ची आठवण करून दिली.'' 


प्रास्ताविकात डॉ. संजय कळमकर म्हणाले, """झुंड' कादंबरीनंतर माझी चांगलीच गळचेपी होत होती. मोकळे व्हावे, असे वाटत होते. म्हणून राजकारण विषय निवडला. या कादंबरीसाठी अध्यात्माचा अभ्यास करावा लागला.'' 


या वेळी लहू कानडे, हिंगलासपूरकर, गटणे, दादा कळमकर आदींनी मनोगत व्यक्‍त केले. सुनील गोसावी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. स्नेहल ठाणगे यांनी सूत्रसंचालन केले. भास्कर नरसाळे यांनी आभार मानले.

loading image
go to top