कण्हेरखेड... दिल्ली दिग्विजयवीर महादजींची जन्मभूमी

कण्हेरखेड - पानिपत युद्धात हुतात्मा झालेल्या शिंदे बंधूंचे स्मृतिस्मारक.
कण्हेरखेड - पानिपत युद्धात हुतात्मा झालेल्या शिंदे बंधूंचे स्मृतिस्मारक.

पुसेसावळी - कण्हेरखेड (ता. कोरेगाव) हे छोटेसे पण हिंदुस्थानच्या इतिहासात मोलाची कामगिरी करणाऱ्या शिंदे सरकारांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. सुभेदार राणोजी शिंदे यांच्यापासून सुरू झालेला या गावाचा ऐतिहासिक प्रवास आजच्या लोकशाहीतील माजी केंद्रीय मंत्री, खासदार ज्योतिरादित्यराजे शिंदे, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे आणि मध्यप्रदेशच्या सांस्कृतिक खात्याच्या मंत्री यशोधराराजे शिंदे यांच्यापर्यंत पोचतो. 

जगप्रसिद्ध पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये या गावातील १६ शिंदे बंधूंनी आपल्या प्राणांचे बलिदान देत गावचा एक नवीन इतिहास रचला. या १६ बंधूंच्या स्मृतिप्रीत्यर्थ ग्वाल्हेर नरेश जयाजीराव शिंदे यांनी कण्हेरखेड गावामध्ये पानिपत वीरांचे १६ खांबी स्मारक आणि तत्कालीन ऐतिहासिक पत्रांत ज्यांचा उल्लेख दक्षिण विश्वसुंदरी म्हणून केला आहे, अशा महाराजा दौलतराव शिंदे यांच्या महाराणी बायजाबाईसाहेब शिंदे यांची सुंदर, नक्षीदार बांधकाम केलेली समाधी बांधली आहे. सुमारे दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीच्या या ऐतिहासिक वास्तू आजही सुस्थितीमध्ये असून, कण्हेरखेड गावामध्ये त्या आपल्याला पाहावयास मिळतात. सर्वांत महत्त्वाची बाब ही की सुभेदार म्हणून उदयास आलेले राणोजी शिंदे यांचा पानिपत मोहिमेवर गेल्यामुळे अर्धवट बांधकाम राहिलेला भव्य असा राजवाडा या गावच्या वैभवात आजही भर टाकत आहे. मागील काळात या राजवाड्याच्या बांधकामासाठी महाराष्ट्र सरकारने काही निधी दिल्याने राजवाड्याचे प्रवेशद्वार आणि आतील काही बांधकाम करण्यात आले आहे. गावात अटकेपार झेंडे लावणाऱ्या साबाजी शिंदे यांचे नातू सरदार मानाजी शिंदे-फाकडे यांच्या वाड्यासह चार ते पाच मोठे वाडे पडीक प्रवेशद्वार आणि भिंतीसह आजही तग धरून उभे आहेत.

प्रथम शाहू छत्रपतींची सासुरवाडी याच गावातील शिंदे सरकार घराण्यातील असल्याने आजही या गावातील शिंदे बंधूंना याचा अभिमान आहे. गावचे ग्रामदैवत जानाईदेवीच्या मंदिराचा जीर्णोद्वार ग्वाल्हेरच्या राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या आदेशावरून सरदार आंग्रे यांनी केला असल्याचे ग्रामस्थ आवर्जून सांगतात. गावामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि माजी रेल्वेमंत्री (कै.) माधवराव शिंदे यांचा पुतळा बसवण्यात आला असून, याचे अनावरण खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते झाले आहे. कण्हेरखेड या छोट्या खेडेगावातील भूमीच्या पुत्रांचा हिंदुस्थानच्या इतिहासात अतुलनीय पराक्रम असून, राणोजी जयाप्पा, दत्ताजी तुकोजी, साबाजी बयाजी, मानाजी ज्योत्याजी, जनकोजी यांनी उत्तर हिंदुस्थानमध्ये मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात केला. याच घराण्यातील महाराजा महादजी शिंदे यांनी तर दिल्लीपर्यंत मजल मारत एकेकाळी समस्त हिंदुस्थान आपल्या ताब्यात घेतला. वकील ए मुत्तल्लक म्हणजेच दिल्लीच्या बादशहाचे सर्वाधिकार प्राप्त असणाऱ्या महादजींनी १७७३ पासून १७९४ पर्यंत दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून अखंड हिंदुस्थानचा कारभार पाहिला. असे महादजी शिंदे हे महाराष्ट्रातील एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहेत.

कोरेगावपासून दहा किलोमीटर अंतरावर... 
कोरेगाव या तालुक्‍याच्या गावापासून दहा किलोमीटर अंतरावर असणारे हे गाव आपल्या पराक्रमाने व कार्यकर्तृत्वाने हिंदुस्थानच्या नकाशावर आजही ठळकपणे आपली कीर्ती गाजवत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येकाने आवर्जून भेट द्यावी, असे हे ऐतिहासिक ठिकाण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com