...यांच्या वादात हरवतोय "विकास'

सचिन शिंदे
सोमवार, 16 मार्च 2020

त्यामुळे गंभीर पातळीवरील मुख्याधिकारी खासगी पातळीवर उत्तर देत आहेत. प्रत्यक्ष आरोप झाले त्या बैठकीला मुख्याधिकारी डांगे उपस्थितच नव्हते. मात्र, मुख्याधिकारी डांगे यांनी नंतर प्रसारमाध्यमांशी संपर्क साधून पालिकेत झालेली सभाच बेकायदेशीर आहे, त्यामुळे आरोपाला काही अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया दिली. आरोप होताहेत, ते डांगे फोटळताहेत, त्यामुळे नागरिकांत संभ्रमावस्था आहे.

कराड : स्वच्छ सर्वेक्षणात लाख लोकसंख्येच्या पालिका क्षेत्रात देशात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या कऱ्हाड पालिकेस सध्या वादाचे ग्रहण लागले आहे. मुख्याधिकारी यशवंत डांगे व नगरसेवकांमध्ये वाद सुरू आहे. मुख्याधिकारी व नगरसवेकांतील वाद कऱ्हाडकरांना नवीन नाही. मात्र, त्या सगळ्या वादात प्रत्येक वेळी कारण वेगळे असते. कधी चांगल्यासाठी तर कधी स्वार्थासाठी विरोध होतो. यापूर्वीच्या अमिता दगडे, प्रशांत रोडे, विनायक औंधकर यांच्या विरोधातही अशीच विभिन्न कारणांनी नगरसेवकांत विरोधाची लाट होती. आत्ताही मुख्याधिकारी डांगे यांच्या विरोधात लाट उसळली आहे. मुख्याधिकारी व नगरसेवकांतील वादाचा विकासावर परिणाम होत आहे.
 

शहरात पालिकेमार्फत अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. त्यावेळी नगरसेवक काहीच बोलले नाहीत. मात्र, त्यानंतर सध्या राजकारण सुरू झाले आहे. व्यापाऱ्यांचे झालेले नुकसान, हॉकर्स झोनचा वाढलेला गुंता, शहरात पडलेला राडारोडा अशा अनेक विषयांवर चर्चा सुरू आहे. पालिकेच्या नुकत्याच झालेल्या मासिक बैठकीत त्याच मुद्यांवर मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना टार्गेट करून अत्यंत खालच्या पातळीवर आरोप झाले. शहराचा मुडदा पाडला. शहरात बॉबस्फोट व्हावा, अशी मोहीम राबवली. यांना करायचे काय, मुख्याधिकारी असूनही ते कोणाच्या तालावर काम करतात, अशा प्रकारचे जाहीर आरोप बैठकीत झाले. त्यामागचे नेमके कारण काय, याचा विचार होण्याची गरज आहे. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांना अपात्रतेची नोटीस दिली आणि मुख्याधिकारी व नगरसेवकांतील वाद चव्हाट्यावर आला. तो वाद इतका विकोपाला गेला आहे की, मासिक बैठकीत अत्यंत खालच्या पातळीवर त्यांच्यावर आरोप झाले. नगराध्यक्षा शिंदे यांनी तर त्यांनी शहराची, व्यापाऱ्यांची माफी मागावी, असे स्पष्ट केले. उपाध्यक्ष जयवंत पाटील, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, फारूक पटवेकर, विरोधी लोकशाही आघाडी व सत्ताधारी गटातील काही नगरसवेक थेट आरोप करत आहेत.

मुख्याधिकारी आल्यापासून आम्ही 32 महिने अपमान सहन करत आहोत, असा आरोप मासिक बैठकीत विरोधी पक्षनेते सौरभ पाटील यांनी केला. त्याचवेळी स्वच्छ सर्वेक्षणासाठी म्हणून अनेक कामांना मंजुरी दिली. त्याचा गैरफायदा मुख्याधिकारी घेत आहेत. आम्ही वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढा, असा ठराव केला होता. तुम्ही गाव मोडायला निघाला, स्वतःला समजता तरी कोण, असा गंभीर आरोप उपाध्यक्ष पाटील यांनी केला. शहराचे विद्रुपीकरण केले. मुडदा पाडला, व्यापाऱ्यांचे नुकसान करून तुम्ही निघालात, असा आरोप ज्येष्ठ नगरसवेक पावसकर यांनी केला. नगरसेवकांत भांडणे लावता, पार्टीत फूट पाडून राजकारण खेळता, असा आरोप फारूक पटवेकर यांनी केला. त्यामुळे गंभीर पातळीवरील मुख्याधिकारी खासगी पातळीवर उत्तर देत आहेत. प्रत्यक्ष आरोप झाले त्या बैठकीला मुख्याधिकारी डांगे उपस्थितच नव्हते. मात्र, मुख्याधिकारी डांगे यांनी नंतर प्रसारमाध्यमांशी संपर्क साधून पालिकेत झालेली सभाच बेकायदेशीर आहे, त्यामुळे आरोपाला काही अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया दिली. आरोप होताहेत, ते डांगे फोटळताहेत, त्यामुळे नागरिकांत संभ्रमावस्था आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karad Development Stagnant Article By Sachin Shinde