आधी अतिक्रमण हटवा, मगच काम सुरू करा 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 February 2020

कराड - पंढरपूर महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. महामार्गाच्या साईड पट्ट्या भरण्याचे काम गावापासून पूर्वेला अर्ध्या किलोमीटरवर सुरू आहे. ते आज ग्रामस्थांनी बंद पडले. चौकातील अतिक्रमण हटवा, मगच काम सुरू करा, असा पवित्रा त्यांनी घेतला. 

झरे : कराड - पंढरपूर महामार्गाचे काम गतीने सुरू आहे. महामार्गाच्या साईड पट्ट्या भरण्याचे काम गावापासून पूर्वेला अर्ध्या किलोमीटरवर सुरू आहे. ते आज ग्रामस्थांनी बंद पडले. चौकातील अतिक्रमण हटवा, मगच काम सुरू करा, असा पवित्रा त्यांनी घेतला.

सार्वजनिक बांधकामच्या पंढरपूर विभागांतर्गत कराड - पंढरपूर महामार्गाचे काम सुरू आहे. याच महामार्गावर झरे येथील चौकात अतिक्रमण आहे. ते हटवण्यासाठी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले होते. 

त्यानंतर अतिक्रमण हटवण्याचा निर्णय झाला. परंतू अद्याप अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे आज महामार्गाचे सुरू असलेले काम बंद पाडण्यात आले. 

याबाबत माहिती अशी, की झरे येथे चौकात कराड पंढरपूर महामार्गावर अनेक दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. चौकांत वाहतुकीची कोंडी सतत होते. बऱ्याच वेळेला अपघात झाले आहेत. अनेक लोक जखमी झाले आहेत. त्याकडे कोणी लक्ष देत नाही. म्हणून आरपीआयतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्याला सर्व पक्षियांनी सर्व सामाजिक संघटनांनी व ग्रामस्थांनी पाठिंबा दिला होता. 
तहसीलदार कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर, आटपाडी, गट विकास अधिकारी, सरपंच सिंधू माने, उपसरपंच हनुमंत मोटे, माजी समाज कल्याण सभापती व जिल्हा परिषद सदस्य ब्रम्हानंद पडळकर, शिवसेनेचे साहेबराव चौरे, बंडू कातुरे, माजी उपसभापती नारायण चौरे, सामाजिक कार्यकर्ते अधिक माने व आरपीआयचे धनंजय वाघमारे यांची बैठक झाली. 

बैठकीत अतिक्रमण हटवण्याचा निर्णय झाला. तसे तहसीलदार सचिन लंगोटे यांनी लेखी पत्र सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूरच्या उपविभाग आटपाडी, गट विकास अधिकारी, पोलीस ठाणे (आटपाडी), व सरपंचांना दिले होते. 

त्यानंतरही अतिक्रमण हटवण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर यांनी कारवाई केली नाही. त्यामुळे आज आरपीआयचे धनंजय वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते अधिक माने, माजी समाज कल्याण सभापती व जिल्हा परिषद सदस्य ब्रम्हानंद पडळकर, उपसरपंच हनुमंत मोटे, नितीन वाघमारे, संजय पाटील, विकास पाटील, अक्षय सासणे व ग्रामस्थांनी काम बंद पाडले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karad - Pandharpur highway road work stopped