कऱ्हाडातील शेतकरी म्हणतायंत...चल चल गड्या ऊस बघायला..

विलास खबाले
शनिवार, 23 मे 2020

एकीकडे कोरोनाचे संकट समोर असताना तालुक्‍यातील उत्पादकांनी मात्र संपूर्ण लक्ष ऊस पिकाकडे वळविले आहे. पीक जोमात आणले आहे. चांगल्या उत्पादनाच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. 

विंग  (ता. कऱ्हाड) : प्रतिवर्षी उन्हाळ्यातील पाणीटंचाई यंदा जाणवलीच नाही. बघेल तिकडे शिवार हिरवाईने नटले आहे. कोरोनाचे संकट समोर असताना कऱ्हाड तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी मात्र संपूर्ण लक्ष ऊस पिकाकडे वळविले आहे. त्यामुळे यंदा ऊस पीकही जोमात असून मनाला गारवा देत आहे. ऊस उत्पादक समाधानी असल्याने सध्या चल गड्या ऊस बघायला, आशा बोलक्‍या प्रतिक्रिया शिवारातून ऐकायला मिळत आहेत. 

आर्थिक नफा मिळवून देणारे पीक म्हणून या पिकाकडे पाहिले जाते. त्यामुळे कऱ्हाड तालुक्‍यातील सर्रास शेतकरी पारंपरिक पध्दतीने हे पीक घेतातच. यंदाही  मोठ्याप्रमाणात शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली आहे. आडसाली, सुरू, पूर्वहंगामी त्यानंतर खोडवा असा त्याचा हंगाम असतो. तालुका कृषी विभागातील आकडेवारीनुसार कऱ्हाड तालुक्‍यात यंदा एकूण 14 हजार 847 हेक्‍टरवर ऊस पीक आहे. यामध्ये आडसाली आठ हजार 249 हेक्‍टर, पूर्वहंगामी तीन हजार 389 हेक्‍टर, सुरू 425 आणि खोडवा दोन हजार 783 हेक्‍टरचा त्यात समावेश आहे. 

तालुक्‍यात सर्वच परिसरात पीके जोमात आहेत. ऊसाच्या कांड्यांची जाडीही चांगली आहे. बघेल तिकडे शिवार हिरवाईने नटल्याचे चित्र आहे. बघताक्षणीच मनाला गारवा देत आहे. प्रतिवर्षी एप्रिल ते मार्च यादरम्यान उन्हाळ्यात विहिरी तळ गाठतात. पाणीटंचाई निर्माण होते. ठिकठिकाणी परिसरात पीक करपल्याचे चित्र दृष्टीस पडते. पिकाचे मोठे नुकसान त्यात होते. ऊस उत्पादकाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. यंदा मात्र उलट चित्र आहे. 

गतवेळी पावसाळ्यात तालुक्‍यात अतिवृष्टी झाली होती. ठिकठिकाणी शेतातून पाणी वाहिले होते. खरिपाचे मोठे नुकसान झाले होते. अतिवृष्टीत विहिरी, तलाव मात्र तुडुंब भरले होते. त्याचाच चांगला परिणाम यंदा ऐन उन्हाळ्यात पाणीसाठ्यावर जाणवत आहे. मे अखेरीस पिकाला पुरेल एवढा विहिरींना पाणीसाठा टिकून आहे.

त्यातच तालुक्‍यात ठिकठिकाणी वळिवने हजेरी लावली आहे. त्यामुळे पिकाला एक प्रकारे जीवदान लाभले आहे. शिवारे हिरवीगार दिसत आहेत. उत्पादकांतून समाधान व्यक्त होत आहे. त्यातच एकीकडे कोरोनाचे संकट समोर असताना तालुक्‍यातील उत्पादकांनी मात्र संपूर्ण लक्ष ऊस पिकाकडे वळविले आहे. पीक जोमात आणले आहे. चल चल गड्या ऊस बघायला... अशा हाका आता शिवारातून येत आहेत. चांगल्या उत्पादनाच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karad Taluka Sugarcane Crop Growing Too Much Good