‘कऱ्हाड दक्षिणे’त आघाडी... ‘उत्तरे’त जुगलबंदी! 

हेमंत पवार- सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

कऱ्हाड - जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी कऱ्हाड दक्षिणमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली. मतविभागणी टाळून सत्तेची सूत्रे आपल्याकडे राहावी, यासाठी दोन्ही काँग्रेसने कऱ्हाड दक्षिणेत आघाडीचा फॉर्म्युला वापरला असला तरी कऱ्हाड उत्तरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ‘स्ट्राँग’ असल्याने ‘एकला चलो’चा नारा दिला आहे. त्यामुळे कऱ्हाड उत्तरमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची जुगलबंदी पाहायला मिळेल. 

कऱ्हाड - जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी कऱ्हाड दक्षिणमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली. मतविभागणी टाळून सत्तेची सूत्रे आपल्याकडे राहावी, यासाठी दोन्ही काँग्रेसने कऱ्हाड दक्षिणेत आघाडीचा फॉर्म्युला वापरला असला तरी कऱ्हाड उत्तरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ‘स्ट्राँग’ असल्याने ‘एकला चलो’चा नारा दिला आहे. त्यामुळे कऱ्हाड उत्तरमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची जुगलबंदी पाहायला मिळेल. 

जिल्हा परिषद-पंचायत समितीसाठी सर्वच पक्षांनी उमेदवार उभे केल्याने निवडणुकीपूर्वी तालुक्‍यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. अनेकांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे उमदेवारांची संख्याही वाढली. तालुक्‍यात बहुतांश ठिकाणी चौरंगी, तर काही ठिकाणी बहुरंगी लढत होत आहे. तालुक्‍यातील सत्ता समीकरणे ताब्यात ठेवण्यासाठी व पंचायत समितीत सत्ता येण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने कऱ्हाड दक्षिणमध्ये आघाडी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कार्वे, वारुंजी, कोळे गट काँग्रेसला आणि येळगाव, रेठरे बुद्रुक, काले गट राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्यात आला आहे. गणात ज्यांचे वर्चस्व आहे, ज्यांच्याकडे तुल्यबळ उमदेवार आहे, त्यांना तो गण सोडण्यात आला आहे. त्यामुळे कऱ्हाड दक्षिणमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचाराचा नारळही फुटला. 

कऱ्हाड उत्तरमध्ये मात्र उलटी स्थिती आहे. तेथे आघाडी झाली नाही. आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरमधील निवडणुका होत आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत त्यांना एकहाती सत्ता मिळाली आहे. यावेळीही ती कायम राखण्यासाठी त्यांनी पहिल्यापासूनच व्यूव्हरचना केली आहे. मात्र, या निवडणुकीत पक्ष व त्यांचे उमेदवार वाढले आहेत. बहुतांश ठिकाणी चौरंगी लढत होत आहेत. मतविभागणीचा धोका असूनही आघाडीचा निर्णय झाला नाही. तेथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत होत आहे. 

भाजप-सेनेबरोबर अपक्षांचाही शड्डू
कऱ्हाड तालुक्‍यात भाजपला उमेदवार मिळत नव्हते. मात्र, यावेळी पहिल्यांदाच भाजपने सर्व गटांत व बहुतांश ठिकाणी गणांत उमेदवार उभे केलेत. शिवसेनेने तांबवे, मसूर, वारुंजी, विंग, येळगाव गटांत व काही ठिकाणी गणांत उमेदवार उभे केले आहेत. सैदापूर, तांबवे, उंब्रज, मसूर, वारुंजी, रेठरे बुद्रुक, काले गटांसह संबंधित गणांतही अपक्ष मतदारांचा कौल आजमावत आहेत. 
 

दोन्ही पक्षांचे अध्यक्ष ‘आउट’
राष्ट्रवादी काँग्रेसचे कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष पांडुरंग चव्हाण यांनी वारुंजी गणातून राष्ट्रवादीकडून, तर कऱ्हाड दक्षिणचे काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी कोळे गणातून काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीच्या फॉर्म्युल्यात ठरलेल्या जागा वाटपामुळे दोन्ही अध्यक्षांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावे लागले.

Web Title: karad zp election