कऱ्हाडच्या गुंडगिरीत मलकापूर "कनेक्‍शन' ; तीन दिवसाला मध्यरात्री घडतो थरार

सचिन शिंदे
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

एक नजर यावरही.... 

 वेगवेगळ्या गुन्ह्यांतील अनेक शूटर्स मलकापूरस्थित आहेत 
 आगाशिवनगरातील गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढण्याची गरज 
 सोळवंडेवरील हल्ल्यातील निम्म्याहून अधिक संशयितही मलकापुरातील 
 बबलू मानेवर हल्ला करणारा बाबर खानही त्याच भागातील 
 वाळूच्या ठेक्‍यातील झालेल्या मारामारीचे मूळही मलकापुरातीलच 
 

कऱ्हाड ः शहर व परिसरात गेल्या काही वर्षांत गाजलेली खून प्रकरणे, गुन्हेगारीत मलकापूरच "हायलाइट' होत आहे. वरेचवर पिस्तूल, रिव्हॉल्व्हर नाचवत मध्यरात्री धिंगाणा, वाढदिवसाच्या पार्टीत नशेत होणारे फायरिंग, बडेभाईच्या नावाखाली गुंडगिरीचे वाढते प्रस्थ समाजस्वास्थ्याला धोकादायक ठरत आहे. मलकापूरच्या आगाशिवनगरसह भागातील गुंडांच्या टोळ्यांचा शहरातील टोळ्यांशी संघर्ष वाढतो आहे. त्यात कऱ्हाडकरांसह मलकापूरकरांनाही वेठीस धरले जात आहे. पोलिस मात्र, कारवाई करण्यास डगमगत आहेत. 

कऱ्हाडच्या गुंडगिरीला पिस्तुलाचे व्यसन लागले आहे. 2009 पासून पिस्तुलानेच हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गुंडांच्या हातात बेकायदा पिस्तूल खेळत आहेत. वाढदिवसाचे फॅड, खंडणी वसुली, साक्षीदार फिरवणे, पैशाची वसुली, बिल्डर, व्यापाऱ्यांच्या लॉबीला वेठीस धरण्यासाठी सर्रास पिस्तूलचा वापर केला जात आहे. फुटकळ स्वरूपाच्या कामातही रागाने भरचौकात दिवसाढवळ्या पिस्तूल उगारण्याचे प्रकारही होतात. महिनाभरापूर्वी झालेल्या अशा प्रकाराची चर्चा आहे. मात्र, पोलिसांच्या लेखी सारे काही आलबेलच आहे. महिन्यापूर्वी पिस्तूल दाखवले गेले. त्यावेळी एक समारंभ होता, म्हणून पुढचा अनर्थ टळला. अन्यथा त्या कार्यक्रमातच फटाकड्याप्रमाणे गोळ्या उडाल्या असत्या. इतक्‍या निर्ढावलेल्या गुंडगिरीवर पोलिसांचा अंकुश नाही. पोलिस कुचकामी ठरत आहेत, असे अजिबात नाही. मात्र, अशा गोष्टी कळल्यानंतर पोलिसांच्या होणाऱ्या साटेलोट्यावर निर्बंध येऊन कारवाई होणे गरजेचे आहे. देणे-घेणे झाल्यामुळे गुंडांची ताकद वाढते आहे. ती स्थिती बदलण्याची गरज आहे. ही स्थिती लक्षात घेऊन सुमारे पाच वर्षांपूर्वी पोलिसांनी आगाशिवनगर भागात सातत्याने "कोंबिंग ऑपरेशन' राबविले होते. त्यावेळी त्या सराईत संशयितांसह गावठी कट्टा, तलवार, कट्यार अशा प्रकारची हत्यारे सापडली होती. त्यानंतरही त्यावर वारंवर लक्ष देण्यात आले. मात्र, अलीकडच्या काळात पुन्हा त्या भागात दुर्लक्ष झाले. परिणामी मलकापुरात तीनपेक्षा जास्त गुंडांच्या टोळ्या तयार झाल्या. त्या दहशत माजवत आहेत. मात्र, पोलिसांकडे त्याच्या नोंदीच नाहीत. 

गुंडगिरीच्या बहुतांशी हालचालींचे मूळ मलकापुरात आहे. पळून जाण्यास सुकर मार्ग असलेले मलकापूर गुंडांसाठी अतिशय पोषक आहे. मलकापूरची व्याप्ती वाढत आहे. नळ पाणीपुरवठा, स्वच्छता या सगळ्यांसह सोलर सिटी म्हणून "आदर्श गाव' असलेल्या याच मलकापुरात गुंडगिरीही पोसली जात आहे. ती वाढते आहे. स्कॉर्पिओ, पजेरो अशा महागड्या गाड्यांतून फिरणाऱ्या संशयितांच्या टोळ्या युवकांना आकर्षित करत आहेत. त्यात त्या टोळ्यांचे शूटर वाढताहेत, ते शूटर्स अत्यंत घातक बनत आहेत. त्याकडे कानाडोळा करून उपयोग नाही. शहरातील गुंडांच्या टोळ्यांशी त्यांचा जेव्हा संघर्ष होतो, त्यावेळी तेच शूटर्स पुढे असतात. त्यांनी गावाला वेठीस धरल्याचे वास्तव आहे. वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करताना त्यात हवेत गोळीबारही होतो. फटाक्‍यांच्या आवाजाने तो झाकण्याचा प्रकार केला जातो, हेच वातावरण शहर व मलकापूरला घातक ठरते आहे. मलकापुरात दर तीन दिवसाला मध्यरात्री काहीना काही थरार होतच असतो. त्यात पिस्तूल काढून कानपट्टीवर ठेवून धमक्‍या देण्याचे प्रकारही होत आहेत. पोलिसांच्या लेखी मात्र सारे काही शांत आहे. पोलिसांना त्या घटना कळत नाहीत, असे नाही. कळाल्या तर ते वेगळ्या पद्धतीने दाबत आहेत. त्यामुळे गुंडांची भिस्त वाढताना दिसते. 

 

पोलिसांवरही हल्ले ? 

गुंडांच्या टोळ्यांची वाढलेली मग्रुरी अनेक अर्थाने काळजीत टाकणारी आहे. ते इतके मग्रुर झाले आहेत, की पोलिसांवरही काहीवेळा हल्ले होण्याचे प्रकार येथे झाले आहेत. बस स्थानकावर अशाच एका संशयिताला पोलिसांनी रात्री फिरत असल्याने हटकले. त्या वेळी त्याने थेट पोलिसावर हल्ला केला. त्यानंतर अशाच एक-दोन घटना मलकापूरच्या हद्दीतही रात्री घडल्या आहेत. त्याच्या नोंदीही आहेत. अनेकदा रात्री उशिरा होणाऱ्या वाहन तपासणीलाही संशयित गुंडांच्या टोळ्या पोलिसांना जुमानताना दिसत नाहीत. थेट भाई, दादा आहे, असे म्हणून ते वाहन रेटून पुढे घेऊन जातात. त्यामुळे शहराच्या हद्दीत होणारे पोलिसिंग अजूनही कठोर होण्याची गरज आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karad's criminal connected to malkapur