esakal | कर्नाटक भाजपमध्ये आता बंडखोरीचे वारे 
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka BJP oration kamal

कर्नाटक भाजपमध्ये सध्या बंडखोरीचे वारे वाहू लागले आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या निकटवर्तीयांनीच बंडाचा झेंडा फडकविला आहे. विजापूरचे आमदार बसवराज पाटील-यत्नाळ यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या असंतुष्ट आमदारांनी बैठक घेऊन आपली नाराजी उघड केली आहे.

कर्नाटक भाजपमध्ये आता बंडखोरीचे वारे 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बंगळूर : भाजपमध्ये सध्या बंडखोरीचे वारे वाहू लागले आहेत. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या निकटवर्तीयांनीच बंडाचा झेंडा फडकविला आहे. विजापूरचे आमदार बसवराज पाटील-यत्नाळ यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या असंतुष्ट आमदारांनी बैठक घेऊन आपली नाराजी उघड केली आहे. बैठकीला दहापेक्षा अधिक आमदार उपस्थित होते. 

ऑपरेशन कमळच्या माध्यमातून सत्तेच्या उंबरठ्यावर पोचलेल्या मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना आणखी एका ऑपरेशनची भीती आहे. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले आमदार उमेश कत्ती आणि राज्यसभेसाठी इच्छुक असलेले माजी खासदार रमेश कत्ती हे येडियुरप्पा यांच्याविरुध्द जोरदार टीका करत आहेत. मूळ भाजप आमदारांकडे दुर्लक्ष करून पक्षांतर केलेल्या आमदारांना मंत्रिपद दिल्याचे त्यांच्या नाराजीचे मूळ कारण आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाच्या नियंत्रणासाठी प्रयत्न करणाऱ्या मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना आता पुन्हा थेट स्वपक्षीयांकडूनच आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या धोरणावर नाराजी व्यक्त करून हायकमांडकडे गाऱ्हाणे मांडण्याचा निर्णय असंतुष्ट आमदारांच्या बैठकीत घेण्यात आल्याचे समजते. मुख्यमंत्री अलीकडे पक्षाच्या आमदारांना भेटत नाहीत. मतदारसंघाचा विकास, विकास योजनांसाठी अनुदान, बदल्या आणि मतदारसंघातील इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यास गेले, तरी ते सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत, अशा बैठकीत तक्रारी मांडण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

भाजपचे ज्येष्ठ आमदार व मंत्रिपदाचे दावेदार उमेश कत्ती, सिद्दू सवदी यांच्यासह बेळगाव व गुलबर्गा जिल्ह्यातील काही भाजप आमदार बैठकीला उपस्थित होते, अशी माहिती भाजपच्या एका आमदाराने दिली. असंतुष्ट आमदारांना मार्चच्या अधिवेशनात स्वतंत्र बैठक घ्यायची होती. तथापि, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन अल्पावधीतच स्थगित करण्यात आले. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या भागात असलेले आमदार आता लॉकडाउन शिथील झाल्याने आणि विधानसभेच्या विविध समित्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या व्यथा सांगण्यासाठी बंगळूरला परतू लागले आहेत. त्यामुळे आता पुन्हा राज्यात राजकीय हालचालींना गती येणार आहे. 


असंतुष्ट आमदारांच्या मुख्य मागण्या 

-मंत्रिमंडळातील उर्वरित 6 रिक्तपैकी 4 जागा त्वरित भराव्यात. 
-मुख्यमंत्री, मंत्र्यांनी आमच्या मतदारसंघातील समस्या जाणाव्यात. 
-मतदारसंघातील सर्व समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे. 
-सरकार चालवणाऱ्या बाह्यशक्तींचे नियंत्रण टाळावे. 

पण कोणतीच राजकीय चर्चा नाही
आम्ही जबाबदार आमदार आहोत. आम्ही काही आमदार एकत्र येऊन स्नेहभोजन केले. एकमेकाच्या समस्या जाणून घेतल्या; पण कोणतीच राजकीय चर्चा झालेली नाही. 
-उमेश कत्ती, आमदार 

loading image
go to top