esakal | कर्नाटक विधान परिषद निवडणूक जानेवारीत? काँग्रेस, BJP, JDS मध्ये चुरस
sakal

बोलून बातमी शोधा

karnataka

विधान परिषद निवडणूक जानेवारीत? काँग्रेस, BJP, JDS मध्ये चुरस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिक्कोडी (बेळगाव) : आमदार महांतेश कवटगीमठ, विवेकराव पाटील यांच्यासह स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून निवडून गेलेल्या 25 विधान परिषद सदस्यांचा कालावधी येत्या 5 जानेवारीला संपुष्टात येत आहे. या निवडणुकीची तयारी काँग्रेस, भाजप, धजदने आतापासूनच सुरू केली आहे.

विधान परिषदेतील एकूण 75 सदस्य संख्यापैकी 25 जणांची निवड ही स्थानिक स्वराज्य संस्थेततून जिल्हानिहाय केली जाते. यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका जिल्हा व तालुका पंचायत सदस्य हे मतदार असतात. या मतदारसंघातून बेळगाव जिल्ह्यातून दोन जणांची निवड केली जाते. सध्या भाजपचे महांतेश कवटगीमठ व अपक्ष म्हणून निवडून गेलेले विवेकराव पाटील (रायबाग) हे जिल्ह्याचे नेतृत्व करीत आहेत. सहा वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विवेकराव पाटील यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय संपादन केला होता. त्यांना जारकीहोळी बंधूसह काँग्रेसचाही छुपा पाठिंबा होता. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार वीरकुमार पाटील यांचा निवडणुकीत निसटता पराभव झाला होता. बैलहोंगलचे अपक्ष उमेदवार डॉ. व्ही. एस. साधुनवर यांनीही या निवडणुकीत चांगली आघाडी घेतली होती. पण त्यांचाही पराभव झाला होता.

यावेळच्या निवडणुकीत भाजपकडून महांतेश कवटगीमठ यांचीच उमेदवारी निश्चित मानली जात आहे. पक्ष संघटनेसाठी भरीव योगदान देण्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेतील समस्या मार्गी लावण्यासाठीही ते सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत असतात. कोविड काळात त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात दौरे करून जनतेला आधार दिला होता. सुमारे 500 हून अधिक पंचायतींचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पीडीओंशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली होती. सक्रियपणे कार्यरत असल्यामुळे ते या पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

काँग्रेस पक्षानेही या निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. काँग्रेसतर्फे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हानिहाय बैठक घेऊन रणनिती व उमेदवार निश्चित केली जाणार आहे. यावेळीही वीरकुमार पाटील यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गतवेळी राज्यात काँग्रेस सत्तेत असल्यामुळे 25 पैकी 14 जागा त्यांनी जिंकल्या होत्या. भाजपचे 6, धजदचे 4 आणि एक अपक्ष उमेदवार निवडून आले होते. साधारणपणे राज्यात जो पक्ष सत्तेवर असतो तोच पक्ष विधानपरिषद, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आघाडी घेतो. यावेळी भाजप सत्तेवर असल्याने जास्त जागा घेण्यासाठी हा पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.

जिल्हा-तालुका पंचायत निवडणुका डिसेंबरपूर्वी?

स्थनिक स्वराज्य मतदारसंघातून विधान परिषदेत 25 सदस्यांची निवड केली जाते. या मतदारसंघासाठी जिल्हा व तालुका पंचायतीचे सदस्यही मतदार असतात. पण राज्यातील सर्व जिल्हा, तालुका पंचायती विसर्जित झाल्या आहेत. या निवडणुका झाल्यानंतरच विधानपरिषदेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जानेवारीपूर्वी जिल्हा व तालुका पंचायतीच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

loading image
go to top