मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी केली अटक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 January 2020

हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावात आलेले मंत्री राजेंद्र पाटील यांना कर्नाटक पोलिसांनी धक्काबुक्की करत अटक केली.

बेळगाव -  महाराष्ट्राचे मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना आज दुपारी बारा वाजता कर्नाटक पोलिसांनी अटक केली. अटक करण्यापूर्वी त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. बेळगाव शहरातील हुतात्मा चौकात हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर तेथे तणाव निर्माण झाला होता.

महाराष्ट्राच्या नेत्यांना दिला होता इशारा

सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना दरवर्षी १७ जानेवारी रोजी येथील हुतात्मा चौकात अभिवादन केले जाते. या अभिवादन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मंत्री पाटील शुक्रवारी बेळगावात आले होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील नेते येऊ नयेत यासाठी कर्नाटक पोलीस महामार्गावर वाहनांची तपासणी करीत होते. पण त्यातूनही मंत्री पाटील बेळगावात पोचले व ते हुतात्मा चौकात गेले. तेथे अभिवादान सुरू असतानाच त्यांना पोलिसांनी अडविले. पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली व अटक केली. यावेळी तेथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या समोरच हा प्रकार घडला त्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर शहरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karnataka police arrested Minister Rajendra Patil Yadravkar in belgum marathi news