
कवठेमहांकाळ ठरणार सौरऊर्जा वापरणारे शहर
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ शहर हे राज्यातील पहिले सौर ऊर्जायुक्त बनविण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसा प्रस्ताव मंत्रालयात दाखल असून, तो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. पथदिव्यांसह प्रमुख शासकीय कार्यालयात; तसेच अन्य विविध योजना सौर ऊर्जेवर चालविण्यात येणार आहेत.
कवठेमहांकाळ नगरपंचायतीचे १७ प्रभाग आहेत. सहा महिन्यांपूर्वी नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक झाली. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी ११ जागा जिंकत बहुमत सिद्ध केले होते. कवठेमहांकाळ शहर ‘स्मार्ट सिटी’ बनवण्याच्या दृष्टीने ते कामाला लागले आहेत. त्याचाच भाग म्हणून प्रत्येक नगरसेवकही प्रभागांत आदेशाचे पालन करीत नवीन नाविन्यपूर्ण योजना राबवण्यासाठी आणि नगरपंचायतीला प्रकाशात आणण्यासाठी कामाला लागले आहेत. तसेच दुष्काळी पट्टा आहे, सौरऊर्जेची उपलब्धता जास्त आहे. पावसाळ्याचे काही मोजके दिवस वगळता पूर्ण शक्तीने ही सौर ऊर्जा चालेल, अशी भौगोलिक रचना आहे.
नगरपंचायतीत घरपट्टी व पाणीपट्टी उत्पन्न कमी आहे. परंतु वीज बिलाचा खर्च जास्त आहे. शहराची लोकसंख्या १७ हजार ३९० आहे. शहरांत १५ शासकीय कार्यालये आहेत. सध्या शहराला नरसिंहगाव येथील तलावांतून पाणी उपसा करून ते महांकाली साखर कारखान्यानजीक शुद्धीकरण केले जाते. ते शहरासह वाडी-वस्तीवर पुरविले जाते. त्याचप्रमाणे बोरगाव येथे विहीर आहे. तेथूनही कवठेमहांकाळ नळपाणी योजना आहे. योजनेतून शहराला पाणीपुरवठा केला जातो; तर माळेवाडी येथे अग्रणी नदीकाठी नगरपंचायतीची पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. या विहिरीतूनही शहराला पाणीपुरवठा केला जातो. शहरात हातपंपही ३४ आहेत.
नरसिंहगाव तलावाकडेला विहीर वीजपंप दोन, बोरगाव एक, कारखान्यानजीक पाणी शुद्धीकरण वीजपंप दोन, हिंगणगावनजीक अग्रणीकाठी माळेवाडी विहीर दोन, शहरातील काळे प्लॉट विहीर एक, बोअरचे विद्युतपंप दोन अशी सुमारे १० विद्युत पंपांमधून शहराला पाणीपुरवठा होत आहे. दरमहा वीजबिलाचा सुमारे सहा लाख रुपये; तर वार्षिक खर्च सुमारे ७० ते ८० लाख रुपये आहे.
पावणेदोन हजार पथदीप
कवठेमहांकाळ शहरात एक हजार ७१५ पथदीप आहेत. नगरपंचायतीतही विजेचा वापर मोठा आहे. त्यामुळे नगरपंचायतीला उत्पादन कमी व वीजबिलावर होणारा खर्च जास्त असल्याने भुर्दंड, अडचणी येत आहेत. हा खर्च कमी करण्यासाठी सौरऊर्जा हा एकच पर्याय आहे. त्यामुळे सौरऊर्जेचा प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव मंत्रालयात दाखल करण्यात आला. तो मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कवठेमहांकाळ राज्यातील पहिले सौरऊर्जा वापर करणारे शहर ठरेल.
पथदीपांना व शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वीजपंपांना लागणाऱ्या विजेचा खर्च सौरऊर्जेद्वारे कमी होणार असून, काही रक्कम वाचणार आहे. सौरऊर्जा प्रकल्पातून तयार होणारी वीज ‘महावितरण’लाही देता येईल.
- डॉ. संतोष मोरे, मुख्याधिकारी
Web Title: Kavathemahankal City Using Solar Energy
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..