कवठेमहांकाळ नगरपंचायत वार्तापत्र  : निवडणुकीच्या वेधाने अंतर्गत मोर्चेबांधणी

गोरख चव्हाण
Friday, 22 January 2021

कवठेमहांकाळ शहराच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या नगरपंचायतीची आगामी सात ते आठ महिन्यांनंतर निवडणूक आहे. निवडणुकीसाठी आतापासूनच अंतर्गत मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

कवठेमहांकाळ (जि. सांगली ) : शहराच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या नगरपंचायतीची आगामी सात ते आठ महिन्यांनंतर निवडणूक आहे. निवडणुकीसाठी आतापासूनच अंतर्गत मोर्चेबांधणी सुरू झाली असली तरी नगरपंचायतीच्या कारभाऱ्यांना आता विकासाचे पत्र मतदारांच्या हाती द्यावे लागेल. मात्र शहरातील सुज्ञ नागरिक पुन्हा एकदा यांच्यावर पुन्हा एकदा विकासाची जबाबदारी टाकणार का हा प्रश्न अद्याप तरी अनुत्तरित आहे. एकंदरीतच आगामी निवडणुकीत नगरपंचायतीत गट बळकटीच्या राजकारणापेक्षा किती विकासाचे राजकारण झाले हे मांडावे लागेल.

शहर हे तालुक्‍याचे मुख्य केंद्र आहे. तालुक्‍यातील विविध गावांतून तसेच इतर भागातून शहरात नागरिकांची शहरात विविध कामांसाठी येत असतात. शहराचा विकास ज्या पद्धतीने होणे आवश्‍यक होते त्या पद्धतीने झाला नसल्याची चर्चा शहरातील नागरिक करत आहे.

चार वर्षे पूर्वी झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत दिलेल्या वचनांची पूर्तता अद्याप अपुरी आहे. दरम्यान, नगरपंचायतीमधील नगरसेवकांच्या असलेल्या वारंवार बदललेल्या भूमिका यामुळे नेत्यांनीही मौनाची भूमिका घेतली आहे. केवळ आणि केवळ विकासकामे सुरू असताना टक्केवारीची चर्चा मात्र शहरातील नागरिक करीत आहे. 

शहरातील सुज्ञ मतदार हा नगरसेवकांना जाब विचारणार पेक्षा आगामी होणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत कोणती भूमिका घेणार हा ही प्रश्न आवसून उभा आहे. नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी बदलत्या राजकारणाची भूमिका घेऊन विकास कामासाठी निधी आणला मात्र त्या निधीतून आपल्या प्रभागाला किती निधी मिळाला याचे चित्र मतदारांसमोर मांडावे लागेल. 

शहरातील अनेक प्रश्न आवासून समोर असताना केवळ नगरपंचायतमध्ये गट - स्वतःच्या राजकारणाला ऊत आला आहे. माझा पक्ष, माझा गट यावर जास्त भर दिला जात असल्याचे चित्र आहे. कवठेमहांकाळ शहराला विकासाचे मॉडेल म्हणून विकसित करण्यासाठी निवडून आलेल्या नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी विकासाचा हिशेब आता मात्र शहरातील मतदारांना द्यावा लागणार हे निश्‍चित. 

संपादन :  युवराज यादव 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kavathemahankal Nagar Panchayat Newsletter: Formation of internal front in view of elections