esakal | कवठेमहांकाळ नगरपंचायत वार्तापत्र : नगरसेवकांची सेटिंग; इच्छुकाचे वेटिंग!

बोलून बातमी शोधा

Kavathemahankal Nagar Panchayat Newsletter: Setting of corporators; new are Waiting for the ticket

शहराच्या विकासाचा आलेख उंचावणाऱ्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या आगामी काही महिन्यानंतर होणाऱ्या निवडणुकांसाठी सत्ताधारी नगरसेवकांनी आतापासूनच सेटिंग लावल्याने नव्या इच्छुकांना वेटिंगवर राहावे लागत आहे.

कवठेमहांकाळ नगरपंचायत वार्तापत्र : नगरसेवकांची सेटिंग; इच्छुकाचे वेटिंग!
sakal_logo
By
गोरख चव्हाण

कवठेमहांकाळ (जि. सांगली) : शहराच्या विकासाचा आलेख उंचावणाऱ्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या आगामी काही महिन्यानंतर होणाऱ्या निवडणुकांसाठी सत्ताधारी नगरसेवकांनी आतापासूनच सेटिंग लावल्याने नव्या इच्छुकांना वेटिंगवर राहावे लागत आहे. विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या नगरपंचायतीत प्रवेश करण्यासाठी इच्छुकांनी प्रभागात अंतर्गत संपर्क वाढवला आहे. नव्या चेहऱ्यांना सेटिंग लावण्यासाठी आतापासूनच वाट पाहावी लागत आहे. एकंदरीत कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सेटिंग-वेटिंगची प्रक्रिया सुरू असल्याचे चित्र आहे. 


कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीत स्थानिक आघाड्यांच्या प्रयोग झाला. मागील साडेचार वर्षांच्या कालावधीत नगरपंचायतीच्या वेगवेगळ्या निवडीत अनेक राजकीय प्रयोग शहरातील सुज्ञ मतदारांनी पाहिले. सध्या नगरपंचायतीमध्ये आपला पक्ष, आपला गट बळकट करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे चित्र आहे; मात्र आगामी नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का, हा प्रश्न अद्याप तरी अनुत्तरित आहे. 


एकीकडे कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपंचायत प्रशासन व नगरसेवक शहरातील नागरिकांना प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करीत आहे; तर दुसरीकडे आगामी निवडणुकीसाठी नव्या इच्छुकांनी सेटिंग लावण्यासाठी तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कवठेमहांकाळ नगरपंचायतीने विविध योजना हाती घेतल्याने, तूर्तास तरी निवडणुकीपेक्षा कोरोनाचे संकट परतून लावण्यासाठी प्रशासनासह नगरसेवकांनी तयारी सुरू केली आहे. 


काही महिन्यांनंतर होणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नव्या चेहऱ्यांनी आतापासूनच संपर्क वाढवला आहे. प्रत्यक्ष निवडणुकीवेळी मात्र स्थानिक परिस्थिती पाहून आघाडी, की पक्षीय निवडणूक यावर निर्णय घेतला जातो. मागील साडेचार वर्षांच्या कालावधीत झालेल्या अनेक वेगवेगळ्या राजकीय प्रयोगामुळे वरिष्ठ नेते कोणती भूमिका घेतात आणि आगामी होणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत जुन्या की नव्या चेहऱ्यांना संधी देतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

संपादन : युवराज यादव