
आता बारामतीकरांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा खेळ पाहायला मिळणार आहे. माजी रणजी खेळाडू व येथील अकादमीचे प्रमुख धीरज जाधव यांनी या बाबत माहिती दिली.
बारामती शहर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमला रणजी सामने खेळविण्यास बीसीसीआयने मान्यता दिल्यानंतर आता बारामतीकरांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा खेळ पाहायला मिळणार आहे. माजी रणजी खेळाडू व येथील अकादमीचे प्रमुख धीरज जाधव यांनी या बाबत माहिती दिली.
सोमवारी (ता. 16) बारामतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमवर महाराष्ट्र बी विरुध्द महाराष्ट्र सी यांच्या प्रत्येकी पन्नास षटकांचा सामना खेळविला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू तसेच आयपीएल खेळलेले केदार जाधव, राहुल त्रिपाठी, निखिल नाईक यांच्यासह महाराष्ट्र संघाचा कप्तान नौशाद शेख हे सोमवारी होणा-या सामन्यात खेळणार आहेत.
सकाळी साडेनऊ वाजता हा सामना सुरु होणार असून बारामतीकरांना विनामूल्य हा सामना पाहता येणार आहे. बारामतीत प्रथमच प्रथम श्रेणी क्रिकेटमधील खेळाडूंचा खेळ पाहायला मिळणार असल्याने क्रीडा रसिकांनी याचा आनंद घ्यावा असे आवाहन धीरज जाधव यांनी केले आहे. रणजी निवड समितीचे अध्यक्ष मिलिंद गुंजाळ, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव रियाज बागवान यांच्यासह प्रशिक्षक सुरेंद्र भावे व इतर मान्यवरही या सामन्यासाठी हजर राहणार आहेत.
बारामतीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमची खेळपट्टी सर्वोत्तम असून येथे सात विकेट असल्याने क्रिकेटसाठी ही जागा उत्तम असल्याचे मत स्वताः मिलिंद गुंजाळ यांनीच व्यक्त केले आहे. ग्रामीण भागातून क्रिकेटर घडावेत या उद्देशाने बारामतीत असे सामने होणे हे फायदेशीर असल्याचे मत क्रिकेटप्रेमी व्यक्त करीत आहेत.