केळवलीच्या धबधब्याची पर्यटकांना साद!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

नागठाणे - प्रसिद्धीपासून काही अंतर दूर असलेला केळवली (ता. सातारा) येथील धबधबा पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. सुटीच्या दिवसांत पर्यटकांची पावले या धबधब्याकडे वळताना दिसत आहे.

नागठाणे - प्रसिद्धीपासून काही अंतर दूर असलेला केळवली (ता. सातारा) येथील धबधबा पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. सुटीच्या दिवसांत पर्यटकांची पावले या धबधब्याकडे वळताना दिसत आहे.

साताऱ्यापासून ३५ किलोमीटरवर असलेला केळवली येथील धबधबा मोजक्‍याच पर्यटकांपर्यंत पोचला आहे. साताऱ्यातून बोगदामार्गे जाणारा रस्ता आहे. तिथून परळी फाट्यावर एक रस्ता ठोसेघरला, तर दुसरा केळवलीला जातो. उरमोडी जलाशयाच्या कडेकडेने निसर्गाची अनुभूती अनुभवत नित्रळ, खडगावपर्यंत डांबरी रस्ता आहे. तिथून काळेश्वरी घाटाने डोंगर उंचावरील केळवलीत जाता येते. वनराईत असलेल्या या गावातून पायी अर्ध्या तासात धबधब्याकडे जाता येते. दोन्ही बाजूला जंगल, सर्वत्र हिरवळीचे साम्राज्य दिसते. अलीकडच्या काळात या धबधब्याला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे.

केळवलीपासूनच काही अंतरावर सांडवली येथेही दोन टप्प्यात कोसळणारा आणखी एक धबधबा आहे. ताकवली गावातूनही नागमोडी पायवाटेने धबधब्यापर्यंत पोचता येते. हिरवे डोंगर, दाट धुके, खळाळणारे ओढे, दुतर्फा भात शेती, पक्ष्यांचा  किलबिलाट, झोंबणारा वारा या निसर्ग अविष्काराचा प्रत्यय परिसरात येतो.

कीटकांपासून सतर्कता आवश्‍यक
धबधबा मार्गावर जळू नावाचे उपद्रवी कीटक मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे पर्यटकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. हे कीटक नकळत पायावर चढून रक्त शोषून घेतात. या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी योग्य ती सतर्कता बाळगणे आवश्‍यक आहे.

Web Title: Kelwali Waterfall Tourist nature beauty