पंचायत समिती बैठकीत वृक्षलागवडीवरून खंडाळ्यात गदारोळ 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 September 2019

केवळ कागदी घोडे नाचवण्याचा सदस्यांचा आरोप.

लोणंद : खंडाळा तालुक्‍यात यंदा वन विभागाने 32 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याचे या खात्याचे अधिकारी सांगत आहेत, तर दुसरीकडे ही झाडे नेमकी कुठे लावली ? हे मात्र, अधिकाऱ्यांना नेमकेपणाने सांगता येत नसेल तर बैठकीला काय आमची तोंडे बघायला येता का? असा प्रश्न उपस्थित करून केवळ कागदी घोडे नाचवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप सदस्य राजेंद्र तांबे व चंद्रकांत यादव यांनी केला. 
दरम्यान, याच मुद्द्यावरून खंडाळा पंचायत समितीच्या मासिक बैठकीत चांगलाच गदारोळ झाला. 

वन विभागाच्या कामकाजाबाबत शंका व्यक्त करून वृक्षलागवडीमध्ये मोठे गौडबंगाल असल्याचा आरोपही सदस्यांनी बैठकीत करून यंदा तालुक्‍यात लावलेल्या सर्व झाडांची प्रत्यक्ष भेट देवून पाहणी करण्याची मागणी केली. त्यावेळी गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले यांनी सात ते आठ जणांनी समिती नेमून चौकशी करण्याचे आश्वासन दिले. 

सभापती मकरंद मोटे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची मासिक बैठक झाली. या वेळी उपसभापती वंदनाताई धायगुडे-पाटील, राजेंद्र तांबे, अश्विनी पवार, चंद्रकांत यादव, शोभा जाधव, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. शिंदे आदी उपस्थित होते. गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले यांनी मागील सभेचे इतिवृत्त कायम करून सभेपुढील विषयांचे वाचन केले. 

या वेळी खातेनिहाय कामाचा आढावा घेण्यात आला. राजेंद्र तांबे यांनी तालुक्‍यातील खासगी रुग्णालयातून जैविक कचरा नेला जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्ह्यात "नेचर इन निड ' या खासगी कंपनीमार्फत हा कचरा उचलला जातो. मात्र, ही कंपनी वेळच्या वेळी कचरा नेत नाही. तशी तपासणीही कोणी करत नाही. त्यामुळे जैविक कचऱ्याची समस्या निर्माण झाल्याचे चित्र आहे. त्यासाठी तालुका आरोग्य विभागामार्फत पथक नेमून खासगी रुग्णालयांना भेटी देवून जैविक कचरा वेळच्या वेळी नेला जातो का, याची तपासणी करावी, अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांना तसे कळवावे, अशी मागणी केली. एसटी महामंडळाच्या पारगाव-खंडाळा आगारामार्फत लोणंद-खंडाळा-वाई ही लोणंद -खंडाळा मार्गावरची एसटी बस बंद करून खंडाळा-लोणंद-फलटण या मार्गावर सुरू केली आहे. मात्र, या गाडीचा उपयोग होत नसून खंडाळा-वाई मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होत आहे. ही एसटी बस पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. लोणंद-खंडाळा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. पावसाळ्यानंतर काम सुरू केले जाणार आहे. लोणंद ते सालपे घाट व तालुक्‍यातील अन्य रस्त्यांसाठीही निधी मंजूर झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मोदी यांनी दिली.

पाणीपुरवठा विभागामार्फत पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी व अन्य उपाययोजनांसाठी निधी उपलब्ध असून, योग्य ते प्रस्ताव वेळेत देण्याची माहिती कार्यकारी अभियंता शिंदे यांनी दिली. 
या वेळी शिक्षण, आरोग्य, वीज मंडळ, लघुपाटबंधारे विभाग, सामाजिक वनीकरण, महिला व बालविकास प्रकल्प विभाग, ग्रामीण रुग्णालय, पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग आदी विभागांचा आढावा घेण्यात आला. उपसभापती वंदनाताई धायगुडे-पाटील यांनी आभार मानले. 

रस्ते, स्मशानभूमीसाठी 66 लाख 

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत तालुक्‍यातील 19 गावांतील स्मशानभूमी व रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 66 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. अंगणवाडींच्या इमारतीच्या दुरुस्तीसाठीही निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती उपअभियंता संजय भोसले यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khandala panchayat samiti meeting