
वार्धक्य, आजारपण, आर्थिक अडचणी किंवा अन्य कारणांमुळे श्रीक्षेत्र जेजुरी किंवा पाली येथे जाऊ न शकणारे अनेक भाविक येथे दर्शनास येतात.
उत्सवात मनोरंजन, मर्दानी खेळ होतात.
राहुरी : देवळाली प्रवराचे ग्रामदैवत खंडोबा महाराज यात्रोत्सव रविवारपासून (ता. 9) सुरू होत आहे. दोन दिवस उत्सव चालेल. खंडोबाच्या जेजुरी व पाली या मुख्य क्षेत्रानंतर जागृत देवस्थानापैकी येथील मंदिर आहे.
अशी आहे परंपरा
माघ पौर्णिमा अर्थात दांडी पौर्णिमेला येथे यात्रा भरते. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. पंचक्रोशीतील शेतकरी नवीन धान्याच्या पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात. नवविवाहित जोडीने दर्शनाला येतात. माहेरवाशीण लहान बाळाला घेऊन दर्शनासाठी आवर्जून येते. पंचक्रोशीतील ग्रामस्थ प्रत्येक शुभकार्याला, तसेच पिकांची लागवड व काढणीप्रसंगी श्री गणेशाबरोबर येथील खंडोबाची आराधना करण्याची परंपरा आहे.
लोककलावंतांची असते हजेरी
वार्धक्य, आजारपण, आर्थिक अडचणी किंवा अन्य कारणांमुळे श्रीक्षेत्र जेजुरी किंवा पाली येथे जाऊ न शकणारे अनेक भाविक येथे दर्शनास येतात.
उत्सवात मनोरंजन, मर्दानी खेळ होतात. नगर, नाशिक, औरंगाबाद, पुणे, बीड जिल्ह्यातील अनेक लोककलावंत, बहुरूपी श्रीखंडोबा देवाचे जागरण करणारे वाघ्या-मुरळींची पथके हजेरी लावतात. पालखी मिरवणुकीत सनई, चौघडा, संबळ, संत गाडगेबाबा आश्रमशाळेतील झांजपथक, अश्वस्वारासह सामील होतात. छबिना मिरवणुकीत वैजापूर, चाळीसगाव व पुणे येथील बॅंडचा ताफा असतो. पौर्णिमेच्या रात्री शोभेच्या दारूची आतषबाजी केली जाते.
कुस्त्यांचा फड
दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता कुस्त्यांचा फड असतो. (कै.) स्वातंत्र्यसैनिक सर्जेराव कदम यांच्या स्मरणार्थ "मल्हारी केसरी' ही मानाची चांदीची गदा जिंकण्यासाठी चुरस असते. विजेत्याला ग्रामदैवत त्रिंबकराज चषक दिला जातो. 71 हजार रुपयांची रोख बक्षिसे दिली जातात. रात्री महाराष्ट्राची लोककला लावण्यांचा फड असतो. साईबाबा संस्थानाचे माजी विश्वस्त अजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा समितीचे सदस्य व कार्याध्यक्ष अमित कदम उत्सवाचे नियोजन करीत आहेत.