आठ महिन्यांनी भरला खरसुंडी बाजार; परिसरातील पंधरा गांवाची गैरसोय दूर

हमीद शेख
Monday, 9 November 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले आठ महिने बंद असलेला खरसुंडी आठवडा बाजार आज रविवारी भरला. पश्‍चिम भागातील नागरिकांना बहुप्रतिक्षीत असलेला हा बाजार भरल्याने नागरिक व व्यापाऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे.

खरसुंडी (जि. सांगली)  : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले आठ महिने बंद असलेला खरसुंडी आठवडा बाजार आज रविवारी भरला. पश्‍चिम भागातील नागरिकांना बहुप्रतिक्षीत असलेला हा बाजार भरल्याने नागरिक व व्यापाऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे. पश्‍चिम भागात खरसुंडी आठवडी बाजार नागरिकांना अत्यंत महत्त्वाचा आहे.

परिसरातील पंधरा ते सतरा गावांतील नागरिक खरसुंडी आठवडी बाजारातून सर्व जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदी करत असतात. याचबरोबर शेतकऱ्यांना भुसार मालाची विक्री करण्यासाठी हा बाजार अत्यंत उपयुक्त आहे. खानापूर, आटपाडी व सांगोला तालुक्‍यातील भुसार मालक, खरेदी करणारे व्यापारी येथे येतात. या आठवडी बाजारात भुसार घेणाऱ्या व्यापाऱ्याकडून आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे सेस जमा केला जातो. 

कोरोनामुळे आठ महिने हा बाजार बंद होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. फिरते व्यवसाय करणारे व्यावसायिक दररोज लागणाऱ्या वस्तूंसाठी मनमानी दर आकारत होते. बाजार बंद असल्यामुळे या व्यावसायिकांची चांदी झाली होती. काही व्यावसायिकांनी स्वतःची वाहने घेऊन प्रत्येक गाववार फिरता व्यवसाय सुरू केला होता. 

ग्रामपंचायतीच्या वतीने हा बाजार लवकर सुरू करण्याचे प्रयत्नही झाले होते. मात्र शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा असल्याने सुरू करण्यात आलेला नव्हता. यासाठी सरपंच लता पुजारी, अर्जुन पुजारी, जितेंद्र पाटील, दिलीप जानकर, सदस्य आणि ग्रामस्थांनी वरचेवर प्रशासनाकडे प्रयत्नही केले होते. 

नागरिकांना आठवडी बाजाराची गेली कित्येक दिवस प्रतीक्षा होती. त्यामुळे आता हा आठवडी बाजार कोरोनाचे सर्व नियम पालन करून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत व्यापारी व नागरिकांना सूचना दिल्या आहेत. 

सिद्धनाथ मंदिरही बंदच 
त्याचबरोबर सध्या खरसुंडी येथील सिद्धनाथ मंदिर दर्शनाकरिता बंद करण्यात आल्याने येथे भाविकांची गर्दी पूर्ण बंद झाली आहे. आठवडी बाजार, रविवार पौर्णिमा हे दिवस खरसुंडीकरिता महत्त्वाचे असतात. मंदिर बंद असल्यामुळे त्यावर अवलंबून असणारी दुकानेही बंद आहेत. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kharsundi market starts after eight months; benifited fifteen villages in the area