खरसुंडी पौष यात्रेत चार दिवसांत 10 कोटींची उलाढाल 

हमीद शेख
Monday, 1 February 2021

राज्यात पहिल्यांदाच भरलेल्या खिल्लार जनावराच्या खरसुंडी पौष यात्रेस जनावरांची आवक 30 हजार, तर 4200 जनावरांची चार दिवसांत खरेदी-विक्री झाली. उलाढाल 10 कोटींची झाली.

खरसुंडी : राज्यात पहिल्यांदाच भरलेल्या खिल्लार जनावराच्या खरसुंडी पौष यात्रेस जनावरांची आवक 30 हजार, तर 4200 जनावरांची चार दिवसांत खरेदी-विक्री झाली. उलाढाल 10 कोटींची झाली. दरवर्षी होणारे खिलार जनावरांचे प्रदर्शन बंदीमुळे होऊ न शकल्यामुळे शौकीनांतून नाराजी जाणवली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पहिलीच खिल्लार जनावरांची माणपट्ट्यातील सिद्धनाथांची पौषी यात्रा खरसुंडी येथे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन भरवण्यात आली होती. 

जातीवंत खिल्लार जनावरांची यात्रा राज्यात प्रसिद्ध आहे. गाई, खोंड व पैदासी करता पाळण्यात येणारे वळीव बैल या परिसरात आहेत. खिल्लार सर्व कामांसाठी वैशिष्ट्यपूर्ण असल्यामुळे राज्यातील अहमदनगर, मराठवाडा, विदर्भ, पुणे जिल्हातील व्यापारी यात्रेत खास करून येतात. यंदा जनावरांची आवक तीस हजारावर झाली. 27 जानेवारीपासून यात्रा भरण्यास सुरवात झाली. दोन-तीन दिवस यात्रेत जनावरांची आवक वाढत होती. राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश व तमिळनाडू राज्यातील व्यापारी (हेडी) वर्षात पहिलीच यात्रा भरल्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी दाखल झाली. चार दिवस खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले. चार हजार दोनशे जनावरांची खरेदी झाली. दहा हजारापुढे आणि पाच लाखापर्यंत खोंड व बैलांची खरेदी झाली. 

शर्यतीवरील बंदी उठवली गेली तर पशुपालक शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ शकतात. शर्यतीच्या बैलाच्या किंमती शेतकरी व शौकिनांच्या मनावर ठरतात. त्याचा फायदा पशुधन पालकांना होतो. शर्यतीवरील बंदी उठवल्यास खिलार जनावरांच्या खरेदी विक्रीत आणखी वाढ होऊ शकते. कोरोनामुळे पौषी यात्रा बाजार स्थळ बदलण्यात आले.

गावापासून एक किलोमीटरवरील मैदानात यात्रा भरली होती. शेतकरी व व्यापाऱ्यांना खरेदी-विक्री करणे सोयीचे झाले. कृषी उत्पन्न बाजार समिती व ग्रामपंचायतीने पाणी, दिवाबत्ती आणि जनावरांकरता वैद्यकीय सुविधा चांगल्या प्रकारे दिल्या. 
यात्रेत इतर व्यवसायिकांना परवानगी नसल्याने कोरोनाचे सर्व नियम पालन करीत यात्रा झाली. रस्त्याच्या दुतर्फा मोकळे मैदान असल्याने फायदेशीर ठरले.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kharsundi Poush Yatra has a turnover of Rs 10 crore in four days