
काही लोकांच्या आयुष्यात संकटांची मालिका येते. ती काही संपायचं नाव घेत नाही. अशाच एका संकटमालिकेतून शिराळा तालुक्यातील खेड येथील राहतं घर कोसळलं, दुरुस्तीला दमडी नाही, उभं रहायला पाय नाही आणि पत्नीनं कसावं तर तिला हात नाही.
शिराळा : काही लोकांच्या आयुष्यात संकटांची मालिका येते. ती काही संपायचं नाव घेत नाही. अशाच एका संकटमालिकेतून शिराळा तालुक्यातील खेड येथील राहतं घर कोसळलं, दुरुस्तीला दमडी नाही, उभं रहायला पाय नाही आणि पत्नीनं कसावं तर तिला हात नाही. त्यामुळे हाताची आणि तोंडाची गाठ पडतानाही मुश्कील झाले आहे. या कुटुंबाला आधार हवाय, त्याआधी डोक्यावर छप्पर हवय.
बाळू बंडू माळी आणि सौ. मालन माळी असे या दांपत्याचे नाव. त्यांना तीन मुली. किमान डोक्यावर छप्पर होतं. तेही कोसळलं. थोड्या भिंती बाकी आहेत. त्या रात्री अंगावर कोसळतील की काय, या भीतीत झोपावे लागते. डोळ्याला डोळा लागत नाही, असे मालन सांगतात. रात्री मोकळं आकाश दिसतं, चांदण्या दिसतात. चंद्राच्या प्रकाशानं पडकं घर उजळून निघतं. जीव मुठीत घेऊन जगताहेत.
बाळू यांना पोलिओ झाला. डावा पाय निरुपयोगी झाला. मालन यांच्या हाताला भाजल्याने वीस वर्षांपूर्वी तिचा उजवा हात खांद्यापासून काढावा लागला. पती पायाने तर पत्नी हाताने अपंग. तीन मुलीचे लग्न झाले. त्यांच्या घराची भिंत अतिवृष्टीने पडली. त्यांनी ग्रामपंचायतीकडे आर्थिक भरपाई नको, नवीन घरकूल द्या, अशी मागणी केली. घराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असली तरी तेथेच संसार मांडावा लागलाय. गेली दोन वर्षे ते घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत.
बाळू 71 व मालन 65 वर्षांच्या आहेत. अपंगत्व आणि आता वृद्धत्व आले. कष्टाची कामे होत नाहीत. थोडी कोरडवाहू शेती आहे. ती वाट्याने देऊन कसे तरी पिकवून जगण्याचा संघर्ष करताहेत. पै पाहुण्यांचा हातभार, रेशनवर उदरनिर्वाह सुरू आहे. यंदा पावसाळ्यात घर जमीनदोस्त होण्याची भीती आहे. त्यांना घरकुल हवंय. खास बाब म्हणून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तत्काळ लक्ष घालावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.
माळी यांच्या घरकुलाचा प्रस्ताव आम्ही पाठवला आहे. त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही.''
- माधुरी पाटील, ग्रामसेविका
संपादन : प्रफुल्ल सुतार
सांगली