छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर गुडघाभर उंचीचे गवत

घनश्‍याम नवाथे 
Friday, 9 October 2020

महापालिकेच्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर काही वर्षापूर्वी लावलेले गवत केव्हाच निघून गेले. कोरोनामुळे खेळण्यास असलेली बंदी, पाऊस व देखरेखीअभावी क्रीडांगणांचा ताबा गवताने घेतला.

सांगली : महापालिकेच्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर काही वर्षापूर्वी लावलेले गवत केव्हाच निघून गेले. कोरोनामुळे खेळण्यास असलेली बंदी, पाऊस व देखरेखीअभावी क्रीडांगणांचा ताबा गवताने घेतला. गुडघ्यापेक्षा जास्त उंचीचे गवत आहे. खेळणे मुश्‍किल बनले. क्रिकेटची खेळपट्टी गवताआड गायब झाल्याची दिसतेय खेळाडूंच्या चालण्या-धावण्याच्या सरावाने चाकोरी पाडली. खेळाडूंना तेवढ्याच भागावर खेळावे लागते. 

महाआघाडीची सत्ता असताना शिवाजी क्रीडांगणावर काही लाख रूपये खर्चून क्रिकेट खेळपट्टीभोवती गवत लावण्यात आले. काही वर्षे देखभाल झाली. काही ठिकाणीच हिरवळ आहे. उर्वरीत भाग उजाड बनला. लॉकडाउन काळात खेळण्यास बंदी होती. एप्रिल, मे महिन्यात क्रीडांगणाची देखभाल-दुरूस्ती झाली नाही. नंतर खेळाडू, महापालिका कर्मचारी फिरकले नाहीत. जे मैदानावर येत, ते गॅलरीखाली आणि वाळलेल्या जागेवर सराव करीत. 

यंदा नियमित व परतीच्या पावसाने क्रीडांगणाची दुरवस्था झाली. क्रिकेट खेळपट्टीसह जवळपास 80 टक्के भागात गाजर गवत आणि पाणवनस्पतींनी कब्जा घेतला. गुडघ्यापेक्षा जास्त उंच गवत वाढलेय. खेळणे मुश्‍किल बनलेय. अनलॉक चार प्रक्रियेत मैदाने खुली झाली. वेगवेगळे खेळ खेळले जाताहेत. व्यायाम, खेळ आवश्‍यक असताना क्रीडांगणाच्या दुरवस्थेमुळे ते शक्‍य नसल्याचे चित्र आहे. गवतामुळे डास व सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला आहे. 
महापालिकेची यंत्रणा कोरोना उपाययोजनेत गुंतली आहे. या काळात व्यायाम, खेळाचे महत्व लक्षात घेऊन तणनाशक फवारून वा अन्य उपायांनी गवत काढण्याची जरज आहे. स्वयंसेवी संस्थांदेखील मदतीला येतील. 

गॅलरीची पडझड 
क्रीडांगणाच्या पश्‍चिमेच्या बाजूस असलेल्या गॅलरीची पडझड सुरू झल्ली आहे. काही ठिकाणी ठिसून बनलेले कॉंक्रीट ढासळून लागले आहे. आतील सळ्या उघड्या पडल्या आहेत. गिलाव्याचे पोपडे पडू लागले आहेत. 

तीनशेवर खेळाडू, नागरिकांचा वावर 
क्रीडांगणावर क्रिकेट, खो-खो, कबड्डी, फुटबॉल या सांघिक खेळ प्रकारासह मैदानी खेळांचे विविध प्रकार खेळले जातात. कराटे, बॉक्‍सिंगही काहीजण खेळतात. खेळाडूंव्यतिरिक्त इतर नागरिक धावणे, चालणे, योगासाठी क्रीडांगणावर येतात. असे रोज तीनशेहून अधिक जण क्रीडांगणावर वावरातात.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Knee-high grass at Chhatrapati Shivaji Stadium