esakal | कोगनोळी नाक्यावर मध्यरात्रीपासून कडेकोट बंदोबस्त; प्रवासासाठी आरटीपीसीआर आवश्यक

बोलून बातमी शोधा

null

कोगनोळी नाक्यावर मध्यरात्रीपासून कडेकोट बंदोबस्त; प्रवासासाठी आरटीपीसीआर आवश्यक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

निपाणी : महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून याचा फटका कर्नाटक सीमाभागाला बसत आहे. त्यामुळे राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार रविवारी (25) मध्यरात्रीपासून निपाणी पोलिसांतर्फे कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी तपासणी नाका येथे बंगळूर सहिता जिल्ह्यातील पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी 100 जादा पोलिसांची कुमक मागविल्याची माहिती मंडल पोलिस निरीक्षक संतोष सत्यनायक यांनी दिली.

सत्यनायक म्हणाले, जिल्हा प्रशासनाकडून महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या नागरिकास प्रवाशांना प्रवेश देताना योग्य ती खबरदारी घ्या. कोरोना तपासणी संबंधित असलेली सर्व ती कागदपत्रे पडताळून मगच कर्नाटकात प्रवेश देण्याच्या सूचना आलेल्या आहेत. त्यामुळे रविवारी मध्यरात्रीपासून निपाणी सर्कलमधील पोलिसांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमा पूर्णपणे बंद केल्या आहेत. त्यामध्ये आप्पाचीवाडी-म्हाकवे, बेनाडी-सुळकूड, मांगूर-यळगुड, निपाणी-मुरगूड या सीमांचा समावेश आहे. या ठिकाणी निपाणी पोलिसांनी नाकाबंदी ठेवली आहे. शिवाय रहदारीचे प्रमुख रस्ते बंद केले आहेत.

जिल्हा प्रशासन व राज्य सरकारकडून पुढील सूचना येईपर्यंत हा बंदोबस्त सुरूच राहणार आहे. विशेष करून पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी टोल नाका येथे महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी केली जाणार असून 48 तासापूर्वी कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रवासी व नागरिकांची कोरोनाची तपासणी झाली पाहिजे. तशा प्रकारची कागदपत्रे असतील तरच संबंधित प्रवाशी व औद्योगिक वसाहतीतीली कर्मचारी वर्गाला राज्यात प्रवेश दिला जाणार आहे. ज्यांच्याकडून नियम व अटीचे पालन होणार नाही, अशावर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे सर्वांनी पालन करावे असे आवाहन सत्यनायक यांनी केले.

हेही वाचा: बेळगावात मेघगर्जनेसह पाऊस; परिसरात गारव्याचे वातावरण

गतवर्षीप्रमाणे मोठा बंदोबस्त

चिक्कोडीचे पोलिस उपअधीक्षक मनोजकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण, शहर, बसवेश्वर चौक व खडकलाट पोलिस ठाण्यातर्फे सहकारी पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने तालुक्यात सर्वत्रच दिवसा व रात्री फिरती गस्ती पथके कार्यरत आहेत. याकाळात कोणाकडूनही नियमाचे उल्लंघन होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेऊन सर्कलमधील चार पोलिस ठाण्यातर्फेस्वतंत्र पथके रविवारी रात्रीपासून कार्यरत राहणार आहेत. कर्नाटकातून महाराष्ट्रात व महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेशासाठी मागील वर्षाप्रमाणे कडक निर्बंध व तपासणी केली जाणार असल्याचेही सत्यनायक यांनी सांगितले.