ग्रामविकासाचा ध्यास घेतलेली कोकळे ग्रामपंचायत झाली ई-ग्राम  

संताजी भोसले 
Saturday, 15 August 2020

दुष्काळाशी दोन हात करीत आता ग्रामविकासाचा ध्यास घेतलेली कोकळे ग्रामपंचायत (ता. कवठेमहांकाळ) ई-ग्राम झाली आहे.

रांजणी : दुष्काळाशी दोन हात करीत आता ग्रामविकासाचा ध्यास घेतलेली कोकळे ग्रामपंचायत (ता. कवठेमहांकाळ) ई-ग्राम झाली आहे. अत्याधुनिक प्रणालीशी ती जोडली गेली. "सकाळ माध्यम समूहा'च्या ऍग्रोवन ऍग्रोटेक इंडस्ट्रीजशी ग्रामपंचायतीचा करार झाला आहे. त्यामुळे हे गाव आता "एका क्‍लिक'वर आले. सरपंच सुवर्णा भोसले यांच्यासह सर्व सदस्य आणि गावातील प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली गाव आता विकासाच्या नव्या दिशेने जाणार आहे. 

विकासाच्या दिशेने धावणारी गावे जगाशी जोडली जावीत, गावातील व्यवहार सहज व सुलभ व्हावा, तरुण पिढीच्या हाती आलेले अँड्रॉईड मोबाईल आणि गावाचा व्यवहार हा एकमेकांशी जोडला जावा, यादृष्टीने ई-ग्राम व्यवस्था बनविण्यात आली. महाराष्ट्रात त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा परिषदेने हे ऍप खरेदी करण्याला मान्यता दिली. ताज्या घडामोडी, शेतीविषयक माहिती, आरोग्यविषयक माहिती, सरपंच, उपसरपंच, सदस्यांची माहिती, गावातील नियमित घडामोडी, विविध कार्यक्रम, गावकऱ्यांशी संवाद आदी गोष्टी एका क्‍लिकवर शक्‍य झाल्या आहेत. या प्रवाहात कोकळे गाव सहभागी झाले. त्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे. 

या उपक्रमाचे व्यवस्थापक प्रीतम बुधावले, बातमीदार संताजी भोसले यांनी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्यांशी याबाबतचा करार केला. आता एखादी माहिती सांगण्यासाठी गावात दवंडी द्यायचे दिवस मागे पडतील. एका क्‍लिकवर गावकऱ्यांना निरोप मिळायला लागतील.

हवामानविषयक शंका व माहिती येथे उपलब्ध होईल. घरपट्टी, पाणीपट्टी, विविध करांची माहितीही त्यावर असेल. त्यामुळे हा उपक्रम अत्यंत फायदेशीर असल्याची भावना सरपंच सुवर्णा भोसले यांनी व्यक्त केली. उपसरपंच विजय तोडकर, सदस्य सुलभा कांबळे, निशाताई पवार, विनायक कांबळे, कमल चव्हाण, मालन पवार, वैशाली महाजन, रामचंद्र शिंदे, मेघा पोतदार, लक्ष्मीबाई नागणे, उदय शिंदे, ग्रामविकास अधिकारी पी. आर. सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले. 

बदलत्या काळानुसार आम्ही ग्रामपंचायत डिजिटल करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गावातील विकासकामांसह शेतकऱ्यांना शेती विशेष सखोल माहिती याद्वारे मिळेल.
सौ. सुवर्णा भोसले, सरपंच, कोकळे 

जगभरातील ताज्या घडामोडी, दवंडी व ग्रामपंचायतीच्या होत असलेल्या विविध विकासकामांची माहिती एका क्‍लिकवर ग्रामस्थांपर्यंत पोचेल.
- पी. आर. सूर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kokale Gram Panchayat became e-Gram