कोल्हापूर महानगरपालिकेतील सात नगरसेवक अपात्र ?

कोल्हापूर महानगरपालिकेतील सात नगरसेवक अपात्र ?

कोल्हापूर - महापालिकेतील दोन्ही काँग्रेसच्या सत्तेला खिंडार पाडण्यासाठी राजकीय हालचालींना आज सकाळपासूनच जोर आला होता. स्थायी समिती सभापती निवडीत पक्षादेश डावलून विरोधी आघाडीला मतदान करणाऱ्या अफजल पिरजादे व अजिंक्‍य चव्हाण या  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरविले.

याबाबतचा आदेश रात्री उशिरा आयुक्‍त कार्यालयाला प्राप्त झाला. या दोघांना आज (ता. ८) हा आदेश बजावण्यात येणार आहे; तर जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केलेल्या पाच नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी मुंबईत जोरदार हालचाली सुरूच होत्या. कोणत्याही क्षणी हा आदेश येण्याची शक्‍यता आहे. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यासाठी राजकीय ताकद पणाला लावल्याची चर्चा आहे. या सात नगरसेवकांमध्ये सहा नगरसेवक दोन्ही काँग्रेसचे, तर एक भारतीय जनता पक्षाचा आहे. ही कारवाई झाल्यास सत्तारूढ दोन्ही काँग्रेसचे संख्याबळ ४४ वरून ३८ इतके खाली येणार आहे. स्थायी समितीपाठोपाठ महापौर निवडणुकीतही बाजी मारण्याच्या हालचाली भाजप-ताराराणी आघाडीकडून सुरू आहेत. स्थायी समितीत झालेला धोका लक्षात घेऊन दोन्ही काँग्रेसनेही सावध भूमिका घेत सत्ता टिकविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर महापौर, उपमहापौर निवडणुकीत पुन्हा घोडेबाजाराच्या दिशेने राजकारण सुरू असल्याचे चित्र आहे.

निवडून आल्यानंतर सहा महिन्यांत जातवैधता प्रमाणपत्र सादर करावे लागत होते. नुकतीच या कायद्यात सुधारणा होऊन ही मुदत १२ महिने इतकी केली आहे; पण कोल्हापूर महापालिकेतील पाच नगरसेवकांनी १२ महिन्यांपेक्षाही जादा दिवसांनी हे प्रमाणपत्र सादर केले आहे. काँग्रेसच्या डॉ. संदीप नेजदार यांनी सहा महिने चार दिवस, वृषाली कदम यांनी सात महिने २७ दिवस, दीपा मगदूम यांनी सहा महिने १६ दिवस, ‘राष्ट्रवादी’चे सचिन पाटील यांनी सात महिने २९ दिवस व भाजपचे संतोष गायकवाड यांनी १० महिन्यांनी प्रमाणपत्र सादर केले आहे. नव्या कायद्याचा फायदा महापालिकेतील १३ नगरसेवकांना मिळाला. या पाच नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे.

अफजल पिरजादे आणि अजिंक्‍य चव्हाण या दोघांनीही पक्षादेश डावलून विरोधी आघाडीच्या उमेदवाराला स्थायी समिती सभापती निवडीत मतदान केल्याने त्यांच्याविरोधात विभागीय आयुक्तांकडे खटला दाखल होता. अशा एकूण सात जणांवर अपात्रतेची कारवाई झाल्याची चर्चा आज दिवसभर महापालिका वर्तुळात पसरल्याने राजकारणात एकच खळबळ उडाली होती. 
निवडणूक होणार चुरशीची

महापौर, उपमहापौरपदासाठी सोमवारी (ता. १०) निवडणूक होणार आहे. त्यात ‘राष्ट्रवादी’कडून सरिता मोरे, तर भाजप-ताराराणी आघाडीकडून जयश्री जाधव यांचे अर्ज आहेत. भाजप-ताराराणी आघाडीने जाधव यांना उमेदवारी देऊनच आपला इरादा स्पष्ट केला आहे. सर्व तयारी ठेवूनच जाधव निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. स्थायी सभापती निवडीप्रमाणेच या निवडणुकीतही धक्का देण्याचा भाजप-ताराराणीचा डाव आहे. सरिता मोरे या अनुभवी नगरसेविका आहेत. त्यांना ‘राष्ट्रवादी’ने उमेदवारी दिली आहे. नंदकुमार मोरे ३० वर्षे राजकारणात आहेत. त्यांचे सर्व राजकीय पक्षांत संबंध असल्याने त्याचा फायदा उठविण्याचा प्रयत्न होणार आहे.

शिवसेनेची भूमिका महत्त्वाची
दोन नगरसेवकांवर कारवाई झाल्याने दोन्ही काँग्रेसचे संख्याबळ ४४ वरून ४२ आले आहे. महापालिकेत शिवसेनेचे चार नगरसेवक आहेत. ते चौघे महापालिका राजकारणात आतापर्यंत काँग्रेसकडे आहेत. त्यांनी भूमिका तशीच ठेवली तर दोन्ही काँग्रेसचे पारडे जड होईल; पण त्यांची भूमिका बदलली, तर मात्र काट्याची टक्कर होण्याची शक्‍यता आहे. चौघे शिवसेना-भाजपकडे गेल्यास त्यांचा आकडा ३७ वर जाऊ शकतो. आणखीन काही नगरसेवकांना ओढण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे  फोडाफोडीच्या राजकारणाला या दोन दिवसांत ऊत येण्याची शक्‍यता आहे. दोन्ही आघाड्यांनी तसे काही चेहरे हेरून ठेवले आहेत. मॅजिक फिगर गाठण्यासाठी दोन्ही काँग्रेस विरुद्ध भाजप-ताराराणी असा मोठा संघर्ष होणार आहे.

नगरसेवक सहलीवर
भाजप-ताराराणी आघाडीच्या हालचालीने महापालिकेच्या राजकारणातील वातावरण चांगलेच तापले. आज दिवसभर निर्धास्तपणे फिरणारे नगरसेवक सायंकाळनंतर मात्र चिंतेत होते. अधिक जोखीम पत्करायला नको, म्हणून दोन्ही आघाडीच्या नेत्यांनी सदस्यांना सहलीवर पाठविले. सहलीचे ठिकाण शहरापासून जवळचे पर्यटनस्थळ आहे.

याचिका मागे, तरीही कारवाई ः जयंत पाटील
पिरजादे आणि चव्हाण यांच्या विरोधातील विभागीय आयुक्तांकडील याचिका आज सकाळी मागे घेण्यात आली होती. तरीही रात्री या दोघांना अपात्र ठरविण्यात आल्याचा दावा स्वीकृत नगरसेवक जयंत पाटील यांनी रात्री दहाच्या सुमारास ‘सकाळ’शी बोलताना केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com