कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेच्या कर्मचारी भरतीवरून सभेत गोंधळ 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - कर्मचारी भरतीवरून प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या वार्षिक सभेत गोंधळ झाला. बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील सभासदांच्या प्रश्नांना समर्थपणे उत्तर देत असतानाच कर्मचारी भरती विरोधात विरोधी सभासदांनी घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळातच दीड तासात सभा संपली. येथील आयर्विन मल्टिपर्पज हॉल येथे बॅंकेची 80 वी सभा झाली. 

कोल्हापूर - कर्मचारी भरतीवरून प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या वार्षिक सभेत गोंधळ झाला. बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील सभासदांच्या प्रश्नांना समर्थपणे उत्तर देत असतानाच कर्मचारी भरती विरोधात विरोधी सभासदांनी घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळातच दीड तासात सभा संपली. येथील आयर्विन मल्टिपर्पज हॉल येथे बॅंकेची 80 वी सभा झाली. 

उपाध्यक्ष बाजीराव कांबळे यांनी स्वागत केले. स्वागत संपताच कागलचे सुनील पाटील यांनी व्यासपीठावर चढून माईकचा ताबा घेतला.  सभेपूर्वी पोलिसांनी शिक्षक संघटनेच्या सात प्रमुख नेत्यांना दिलेल्या नोटिसांवर खुलासा करण्याची मागणी केली. त्यामुळे सभेत सुरुवातीपासूनच गोंधळास सुरुवात झाली. त्यावर अध्यक्ष पाटील यांनी एका दैनिकात (सकाळ नव्हे) शिक्षक बॅंकेची सभा उधळून लावणार, अशी बातमी आली. त्याची माहिती शाहूपुरी पोलिसात दिली. त्यामुळे पोलिसांनी संबंधितांना सभेत शांततेने चर्चा करावी, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, यासाठी नोटिसा दिल्याचे स्पष्ट केले. 

अध्यक्ष पाटील यांनी प्रास्ताविकात बॅंकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. दोन वर्षांत बॅंकेच्या भांडवलात, ठेवीत वाढ झाली. सध्या बॅंक भक्कम आर्थिक स्थितीत उभी आहे. दोन वर्षात भरीव नफा झाल्याने सभासदांना यावर्षी सर्वाधिक लाभांश दिला जात आहे. 
सीईओ श्रीकांत कुलकर्णी अहवाल वाचन करत असताना "स्टॉपिंग पॅटर्न' ठराव मंजूर झाल्याचे सांगताच रविकुमार पाटील व जोतिराम पाटील यांनी त्यास आक्षेप घेतला.

सभासदांनी स्टॉपिंग पॅटर्नला विरोध केला आहे. त्याची नोंद नाही, त्यामुळे प्रोसिडिंग खोटे लिहिले आहे. सभासदांनी मंजुरी दिलेली नाही, असा पाटील यांनी दावा केला. त्यावर अध्यक्ष पाटील यांनी हा ठराव बहुमताने मंजूर झाल्याचे सांगितले. 

त्यानंतर विषयपत्रिकेवरील सर्व ठराव बहुमताने मंजूर झाले. अध्यक्ष पाटील सभासदांच्या प्रश्नाला उत्तरे देत असतानाच नोकरभरती करणाऱ्या संचालकांचा धिक्कार असो, "रद्द करा, रद्द करा, नोकरभरती रद्द करा', अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. 
समितीचे जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील, प्रमोद तौंदकर, राजेंद्र पाटील, सतीश बरगे, संदीप मगदूम, सुरेश कांबळे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णात धनवडे, रवी शेंडे आदींनी नोकर भरतीस विरोध करून गरज नसताना नातेवाइकांची भरती केल्याचा आरोप केला. 

याबाबत अध्यक्ष पाटील म्हणाले, ""सहकार खात्याच्या मंजुरीने सरकारमान्य संस्थेकडून ऑनलाईन पद्धतीने नोकरभरती केली आहे. 15 वर्षांत 61 कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. बॅंकेचा व्यवसायही वाढला आहे. बॅंकेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी केवळ 30 कर्मचाऱ्यांची भरती केली आहे.'' 

अध्यक्षांची प्रश्नोत्तरे व विरोधकांच्या घोषणा सुरू असतानाच दीड तासात सभा संपली. संचालक साहेब शेख, शिवाजी पाटील, बजरंग लगारे, संभाजी बापट, राजमोहन पाटील, नामदेव रेपे, प्रसाद पाटील आदी उपस्थित होते. 

14 टक्के लाभांश 
शिक्षक बॅंकेच्या वार्षिक सभेत अध्यक्ष दिलीप पाटील यांनी सभासदांना यंदा बॅंकेच्या इतिहासात सर्वाधिक 14 टक्के लाभांश देण्याचे व अर्धा टक्के कर्ज व्याजदर कमी केल्याचे जाहीर केले. त्यास सभासदांनी टाळ्या वाजवून दाद दिली.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur A disturbance in the meeting over the recruitment of staff of the Primary Teachers Bank